News34 chandrapur
शोकसंदेश
‘चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी’
खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक
वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकसंवेदना
चंद्रपूर : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.
————————
हंसराज अहिर
खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या अकाली दु:खद निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. ते शिवसेनेत असतांना त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. धाडसाने आणि आत्मविश्वासाने काम करणारा एक राजकीय नेता आपण गमावला आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटूंबासोबत आहेत, धानोरकर कुटूंबियाना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार स्व. बाळुभाऊ धानोरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली… ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर
लढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा – माजी मंत्री, आ.वडेट्टीवार
चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच मन सुन्न झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना पितृशोक झाल्याची माहिती कळली. पितृशोकाच्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यापूर्वीच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथे हलवण्याची माहिती मिळाली. मात्र अतिशय जिगरबाज व लढाऊ वृत्तीचे असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार अशी आशा होती.
मात्र नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर आघात केला व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचा लढवय्या शिपाही म्हणून त्यांची ओळख होती. जनतेच्या हितासाठी राबणारा लढवय्या नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर – आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन म्हणजे मनाला दुःखद वेदना देणारी व काळजाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हानी झाली असून राजकारणातील एक लढवय्या नेतृत्व हरपले.अशा दुहेरी दुःखद संकट प्रसंगी संपूर्ण धानोरकर कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी असून या दुःखातून सावरण्यासाठी धानोरकर कुटुंबीयांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शोकसंदेश-
राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला – आ. किशोर जोरगेवार
आपल्या दबंग शैलीतुन नागरिकांचे काम करुन देणारा नेता म्हणून खासदार धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या याच शैलीमुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. त्यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी असुन त्यांच्या निधनाने राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला असल्याचे चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
शिवसेनेत असतांना खासदार बाळु धानोरकर यांच्या सोबत काम केले. त्यामुळे त्यांची काम करण्याची पध्दत जवळून पाहता आली. स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय गणिताची त्यांना अचुक समज होती. त्यामुळेच ते शिवसैनीक ते खासदार असा प्रवास सहज करु शकले. 2009 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. पण ते खचले नाही. पून्हा नव्या जिद्दीने काम करत त्यांनी 2014 ची निवडणूक जिंकली. नंतर लोकसभेसाठी उभे राहत ते खासदार झाले. या प्रवासात अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले. कार्यकर्त्यांना मोठे केले. आज त्यांच्या जाण्याने असंख्य कार्यकर्तेही पोरके झाले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता गमावला
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही – रामू तिवारी
चंद्रपूर : कार्यकर्त्यांवर जिव लावणारा, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा, कार्यकर्ते हेच आपले कुटुंब मानणारा नेता म्हणजे खासदार बाळूभाऊ धानोरकर. घरी कोणताही राजकीय वारसा नव्हता. मात्र, समाजासाठी काही, तरी करण्याची जिद्द मनात होती. यातूनच बाळूभाऊ नावाचा तारा जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आला. आपली राजकीय कारकिर्द कार्यकर्ता म्हणून सुरू करणाऱ्या बाळूभाऊंनी पुढील संपूर्ण राजकीय आयुष्य कार्यकर्त्यांना बळ देण्यात आणि गोरगरिब जनतेची प्रश्न सोडविण्यात घालवली.
त्यामुळे भद्रावती या छोट्याशा गावापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहचला. मात्र, कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांना समजून घेणारा नेता आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही. बाळूभाऊंनी राजकीय जिवनात ऐन बहरण्याच्या वेळी अचानक एक्झिट केली. त्यांची ही एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासारखा दुसरा नेता पुन्हा होणे नाही.
पेशाने शिक्षक असलेल्या नारायणराव धानोरकर यांच्या घरी ४ जुलै १९७५ रोजी बाळूभाऊंचा जन्म झाला.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या बाळूभाऊंनी चांगले शिक्षण घेऊन जिवनात यशस्वी व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु, समाजातील गोरगरिबांचे दुख बाळूभाऊंना स्वस्थ बसू देत नव्हते. आपण समाजाला काही देण लागतो, या भावनेतून बाळूभाऊंनी समाजकार्य सुरू केले. यानंतर मतदारांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून संधी दिली. लगेच पुढील लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पाठविले.
बाळूभाऊ यांनी कधीही खासदारीकाचा आव आणला नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते थेट त्यांच्यापर्यंत पोहचू लागले. संपूर्ण लोकसभा क्षेत्रात त्यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार केली. भाऊंसोबत मित्र म्हणून आणि नंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून घालविलेले प्रत्येक क्षण आनंदी आहेत. भाऊंसोबतच्या अनेक आठवणी आहेत. मात्र, आता या केवळ आठवणीच राहिल्या आहेत. भाऊंच्या जाण्याने मी जिवनातील चांगला मित्र गमावला आहे.
काँग्रेस पक्षासोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धानोरकर कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. धानोरकर कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सर्वजण सोबत आहो. हे दुख पचविण्याची देवाने त्यांना शक्ती द्यावी, ही प्रार्थना…
भाऊ…
भावपूर्ण श्रद्धांजली
चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आकस्मित निधनाने जिल्ह्यातील आणि महाराष्टातील काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची अपरिमित हानी
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाळूभाऊंना “भावपूर्ण श्रद्धांजली”
राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मध्यस्थीमुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसपक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार बदलवून ऐनवेळी बाळूभाऊ धानोरकरांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली,आणि आद पवारसाहेबांची निवड सार्थ ठरवीत बाळभाऊ राज्यातून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले.
पवारसाहेब यांच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून लोकसभा निवडणुक जिंकल्याबरोबर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई येथे “सिल्व्हरओक” निवासस्थानी भेट घेतली सोबतच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आद.अजितदादा पवार यांचीही कृतज्ञता भेट घेतली – ती आठवण !
बाळुभाऊ यांचा हा विजय दीर्घकाळ अनेक वर्ष टिकून राहील अशी आशा होती ! परंतु अचानक नियतीने डाव साधला आणि एकाएकी बाळुभाऊ आपल्या सर्वांना सोडून गेले.त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने एक तरुण/तडफदार धडाडीचा नेता गमावला, बाळुभाऊंच्या निधनामुळे काँग्रेस सोबतच महविकास आघाडीला प्रचंड आघात बसला !
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो,आणि त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती प्रदान करो !
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाळूभाऊंना – ” भावपूर्ण श्रद्धांजली” !
चंद्रपूरच्या राजकारणातला निडर लिडर हरपला
राजकारणात माझ्या सारख्या असंख्य युवकांना घडविणारं प्रेरणादायी नेतृत्व, मोठे बंधू पोरके करून गेले- सिनेट सदस्य , युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश र. बेलखेडे
आज सकाळी खासदार बाळूभाऊ धानोरकर आपल्यात नाही राहिले हे ऐकून मन सुन्न झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनावर वर्चस्व ठेवणारे एक दबंग नेते म्हणून ओळखले जाणारे बाळूभाऊ धानोरकर यांच्या सोबत शिवसेनेमध्ये असतांना जवळीक निर्माण झाली. त्यांच्या कामाची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी होती.स्वत:च्या हिमतीने त्यांनी जिल्ह्यात स्वतः ची एक वेगळी छाप पाडून धानोरकर ब्रॅंड तयार केला.
माझ्या सारख्या कित्येक नव युवकांना आपल्या कार्यशैलीने , वकृत्वाने प्रभावीत करून त्यांनी मार्गदर्शन केले.मला तर मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी साथ दिली. त्यांचे स्मितहास्य ,खांद्यावर ठेवलेला प्रेमाचा हात कित्येकांच्या चेहर्यावर एका भावाने मायेची,प्रेमाची साथ असल्यासारखं वाटत असायचं. शिवसेना सोडून कांग्रेस मध्ये प्रवेशानंतरही त्यांनी राजकिय जिवनात समाजकार्यात मला सहकार्याची भुमिका पार पाडली. एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीसुद्धा राजकारणात आपल्या कार्यामुळे ,कुशल कौशल्याने इतकी मोठी उंची गाठू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले बाळूभाऊ धानोरकर.
माझ्या सामाजिक व राजकीय जिवनात भाऊचं असाधारण महत्त्व असून भाऊच्या जाण्याने हि उणीव न भरून निघणारी आहे. ते आता आपल्याला दिसणार नाही हे कडू सत्य मन न मान्य करणार असून भाऊंची लढवय्यी वृती ,त्यांच्या समाजकार्यामुळे सदैव ते प्रेरणा म्हणून माझ्या ह्रदयात राहील . भाऊच्या जाण्याने पोरके झालेले सर्व कार्यकर्ते व त्यांच्या कुटूंबाला ईश्वर या दुख:तून सावरण्यासाठी शक्ती देवो व स्व. बाळूभाऊ यांच्या आत्म्याला शांती देवो हिच प्रार्थना.