चंद्रपूर जिल्हा महिला पोलिसांसाठी SHE VAN ची सुविधा

चंद्रपूर पोलिसांनी सुरू केली She Van

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी SHE VAN ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, विशेष म्हणजे यासाठी जुन्या चारचाकी वाहनाची दुरुस्ती करण्यात आली आहे, सदर संकल्पना पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांची आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सण, उत्सव व यात्रा दरम्यान महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येतो मात्र त्यावेळी महिला पोलिसांना शौचास जाण्यासाठी कसलीही सुविधा उपलब्ध नसते, नैसर्गिक क्रिया थांबविल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

यावर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी मोटर परिवहन विभागातील नादुरुस्त असलेले चारचाकी वाहनांचे रूपांतर महिला पोलिसांसाठी स्वच्छता गृह म्हणून करण्यात आले.

पोलिसांच्या बंदोबस्तात पुरुष कर्मचारी आडोसा घेत नैसर्गिक क्रिया पूर्ण करतात मात्र महिला पोलिसांना कसलाही पर्याय उपलब्ध नसतो, विशेष म्हणजे बंदोबस्त असते वेळी लघवी लागू नये यासाठी पाणी सुद्धा पिणे महिला पोलीस टाळत असतात.

आता ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी she van ची निर्मिती केली आहे, या वाहनात 2 टॉयलेट, 1 वॉशरूम, पाणी व फॅन ची व्यवस्था करण्यात आली आहे.

She Van महिला पोलिसांसाठी फिरते प्रसाधन गृह म्हणून जिल्ह्यात बंदोबस्तात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या सुविधेसाठी याचा वापर होणार आहे.

ही सुविधा सुरू झाल्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मानसिकता व आरोग्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही, नुकतेच या फिरत्या प्रसाधनगृहाचे उदघाटन पोलीस अधीक्षक परदेशी, सौ.प्रीती रविंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, मोटर परिवहन विभागाचे निरीक्षक सुरेश आस्कर, मेकॅनिक स्टाफ व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.