सीआरपीएफ, कोब्रा, सीएएफ, डीआरजी, एसटीएफच्या नक्षलविरोधी अभियान दरम्यानची घटना.
गडचिरोली;
जिल्हा सीमे लगतच्या छत्तीसगड राज्यातील विजापूर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी बॉम्ब स्फोटात दोन जवान शहीद तर चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी त्यांना हेलिकॉप्टरद्वारे रायपूर येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस जवान नक्षल विरोधी शोध मोहीम राबवून परत येत असताना नक्षलवाद्यांनी पाईप बॉम्बचा स्फोट करून पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एसटीएफचे हेड कॉन्स्टेबल भरतलाल साहू (रायपूर) व कॉन्स्टेबल सतेरसिंग (नारायणपूर) हे दोघे शहीद झाले असून पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार गंभीर जखमी झाले आहेत.
सीआरपीएफ, कोब्रा, सीएएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान नक्षलविरोधी अभियानात राबवित होते. (ता. १७ जुलै) बुधवारी रात्री दरम्यान नक्षलवाद्यांनी तर्रेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडीमार्काच्या जंगलात बॉम्ब स्फोट घडवून आणला आहे. सदरच्या घटनेला बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दुजोरा दिला आहे. एकीकडे महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलीस दलाला १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात फार मोठ यश लाभलं असतांना, दुसरीकडे छत्तीसगड पोलिसांचे नक्षल शोध मोहीम राबवत असताना झालेल्या ब्लास्टमध्ये दोन जवान शहीद झाल्याची दुःखद घटनेतुन फार मोठे नुकसान झाले आहे.