त्रासाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या,

कोंबडी कापण्याच्या धारदार सुरीने वार करून चिरला गळा,

चंद्रपूर;
दारूच्या व्यसनाधीन पतीच्या त्रासाने पत्नी कंटाळली होती. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीत नेहमीच कडाक्याचे भांडण होत असल्याचे. भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेऊन धारदार शस्त्राने पतीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे (ता. १७ जुलै) बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या दरम्यान घडली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव अमोल मंगल पोडे (३८) रा. नांदगाव (पोडे) ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आहे. आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे (३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

बल्लारपूर तालुक्यात नांदगाव (पोडे) गावची पाच हजारांवर लोकसंख्या असून गावात पती-पत्नीच्या वादातून ही घटना दुसऱ्या दिवशी (ता.१८ जुलै) गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मृत अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे (११) व सारंग अमोल पोडे (८) एकत्र राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता. नेहमीच्या वादाने पत्नी लक्ष्मी त्रस्त झाली होती.

नेहमी प्रमाणे बुधवारी अमोल मद्यधुंद अवस्थेत घरी आल्याने दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने अमोलला संपविण्याच्या कट रचून दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपण्याची वाट ती पाहत होती, त्यानंतर घरचे सर्व झोपल्याची संधी साधून तिने कोंबडी कापण्याच्या धारदार सुरीने सपासप वार करून अमोलचा गळा चिरून त्याची हत्या केली आहे. सदरची बाब सकाळी झोपेतून उठलेली दोन्ही मुले व लक्ष्मीच्या आईच्या निदर्शनात आली त्यांनी लक्ष्मीला जाब विचारला तेव्हा पतीच्या हत्येची माहिती स्वतः लक्ष्मीने चंद्रपूर शहर पोलिसांना दिल्याची माहिती आहे. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आहे, मृतक अमोलचे शव ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.