पर्यायी रस्ता गेला वाहून, गरोदर मातेचा जीवघेणा प्रवास,

भामरागड तालुक्यातील नदी, नाल्यांवरील पुलांच्या बांधकामात दिरंगाई!

भामरागड;(गडचिरोली)
तालुक्यात राज्य व केंद्र शासनाकडून विविध ठिकाणी नदी व नाल्यांवरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग मजबूत न केल्याने १६ आणि १७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदरचा मार्ग वाहून गेला होता. याचा फटका थेट गरोदर मातेला वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात जातांना बसला आहे.

कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने तिला जेसीबीच्या बकेट मध्ये बसवून नाला ओलांडण्याची नामुष्की ओढवली आहे. झुरी मडावी ही घरी असतांना तिला (ता.१८ जुलै) गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक प्रसूतीच्या कळा येण्यास सुरूवात झाली. ही माहिती येथील आशा वर्कर संगीता शेगमकर यांना समाजल्यावरून त्यांनी बोटनफुंडी येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी रीचा श्रीवास्तव यांना दिली. त्यांनी तात्काळ ताडगाव आरोग्य पथक येथील रुग्णवाहिका मागवून कुडकेली गावाकडे झुरी मडावी या गरोदर मातेला उपचारार्थ घेऊन येण्यास निघाल्या. मात्र, राष्ट्रीय महामार्गवरील कुडकेली गावाशेजारी असलेल्या नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे आशा वर्कर संगीता शेगमकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कसेबसे त्या गरोदर मातेला घेऊन ३ किलोमीटर वरील नाल्यापर्यंत पायी चालत पोहचविण्यात आले. यावेळी नाल्याच्या पलीकडे रुग्णवाहिका असल्याने आणि नाला दुथळी पाण्याने भरून वाहत असल्यामुळे त्या गरोदर मातेला नाला ओलांडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने त्याठिकाणी कामावर असलेल्या जेसीबीच्या बकेट मध्ये बसवून तिला नदी ओलांडावी लागली आहे.

एकीकडे प्रसुती कळा सुरू असल्याने असंख्य वेदना आणि दुसरीकडे जीवघेणा प्रवास अश्या परिस्थितीत कसेबसे आशा वर्कर आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी तसेच गावकऱ्यांच्या मदतीने त्या गरोदर मातेला नाला ओलांडून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. कुडकेली नाल्यावरून जवळपास १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने ती सुखरूप असून आरोग्य यंत्रणा व गावकरी नागरिकांच्या सहकार्याने झुरी मडावी ही गरोदर महिला रुग्णालयात सुखरूप पोहोचली आहे. तिच्या गर्भार अवस्थेची तपासणी करून उपचार केले जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.