अर्धवट उपचाराने परत घराची वाट, मज्जी पितापुत्र निराश!
भामरागड; (गडचिरोली)
तालुक्यातील भटपार येथील मालू केये मज्जी (६७ वर्ष) हे शेतकरी शेतीकाम करताना चिखलात घसरुन पडल्याने जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मुलगा पुसू मज्जी व त्याच्या मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखल तुडवत तब्बल १८ किलोमीटर पायपीट केली आहे. वाटेत दुथळी भरून वाहणारी नदी आणि मुलाचे पित्याप्रती ओसंडून वाहणारे प्रेम, त्यामुळे मुलाने धोकादायक डोंग्याच्या साह्याने नदीची वाट पार करून आपल्या पित्याला रुग्णालयात भरती केले होते, मात्र टीचलेल्या पायाच्या हड्डीवर पुरेसे उपचार न मिळाल्याने अर्धवट उपचार घेऊन मालू मज्जी यांच्यावर आल्या पावली घरी परत जाण्याची निराशाजनक वेळ ओढवली आहे.
जिल्ह्याच्या मागास, अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही मुलभूत सोयीसुविधा पोहचल्या नसल्याचे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमधून पुढे आले आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांची दैना अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ते विरहित भागातील लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी पायपीट करत रुग्णालय गाठावे लागत आहे. गर्भवती महिलांनाही प्रसुती काळात रस्त्या अभावी रुग्णवाहिका उपलब्द होत नाही, त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. अशाच गैरसोयीचे आणखी एक विदारक चित्र म्हणजे मालू मज्जी यांना खाटेची कावळ करून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यातून समोर आले आहे.
आठवडाभरपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसाचा सर्वाधिक फटका भामरागडला बसला आहे. परिणामी पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने भामरागड व इतर गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. मालू मज्जी हे (ता. २६ जुलै) शुक्रवारी स्वतःच्या शेतात काम करीत असतांना त्यांचा पाय चिखलातून घसरला व त्यांच्या पायाला जबर मार लागला आहे. यात त्यांना असाह्य वेदना होऊ लागल्याने त्यांना चालणे, फिरण्यासाठी त्रास होत होता.
वेदनेने विव्हळणाऱ्या पित्याला भटपार गावापासून १८ किमी अंतरावरील ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यासाठी १८ किमीचा चिखल तुडवत पायपीट करून त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्यावर झोपवून भामरागडच्या रुग्णालयात उपचारार्थ केले होते. यावेळी डॉक्टरांनी मालू यांच्या पायाची हद्दी टीचरलेली असल्याचे निदान केले. यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला, शस्त्रक्रियासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १८ किमीची कसरत करून वैतागलेल्या मज्जी पितापुत्रांनी पुढील उपचारार्थ १८० किमीच्या प्रवास कसा करावा या विवंचनेत प्राथमिक उपचार घेऊन पुन्हा आल्यापावली पुसू मज्जी याने निराश होऊन आपल्या वडिलांना घेऊन खाटेच्या कावडेतून भटपारचे स्वतःच्या घरी परत यावे लागले आहे.