गर्भवती महिलेसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे रेस्क्यू ऑपरेशन,

शासकीय बोटीच्या साह्याने ६४ किमीचा प्रवास, रुग्णालयात सुखरूप दाखल,

सिरोंचा;(गडचिरोली)
तालुक्यातील कर्जेली येथील सोनी संतोष आत्राम (२६ वर्ष) गर्भवती मातेच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून तिला आरोग्य यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाचे एसडीआरएफ टीमने जीवाची बाजी लावून दुथळी पाण्याने भरून वाहणाऱ्या नाल्यातून बोटीच्या साहाय्याने ६४ किमीचा प्रवास करून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

कर्जेली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तब्बल ६४ किलोमीटर अंतरावर असून झिंगानुर प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. गावाच्या पूर्वेस इंद्रावती नदी, दक्षिण व उत्तरेस दोन्ही बाजूला मोठे दोन नाले वाहतात, पश्चिमेस घनदाट जंगल आहे. शेजारच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम झालेले नसल्याने आणि पावसाळ्यात नाला दुथळी भरून वाहताना नागरिकांना नाल्याच्या पाण्यातून हात बनावटीच्या डोंग्याच्या साह्याने जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. जवळपास ३०० लोकसंख्येचे लहानशा गावातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी कोणतीही जवळची बाजारपेठ उपलब्द नाही, त्यामुळे संकटाच्या काळात आरोग्य उपचार व साहित्य खरेदीसाठी १५ ते २० किलोमीटर अंतरावरील झिंगानुर, देचलीपेठा या गावांमध्ये जावे लागते.

सोनी संतोष आत्राम यांच्या प्रसूतीची ही दुसरी खेप असून झिंगानुर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ वाया न घालवता, तिला रमेशगुडम, कोपेली, सोमणपल्ली, असरअली मार्गे सिरोंचा मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्याचे परिश्रम घेतले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज तिची प्रसूती संभाव्य तारखेला होईल असे सांगितले आहे.आरोग्य यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाचे एसडीआरएफ टीमच्या कार्याचे सर्वत्र आभार मानले जात आहे.