इम्पॅक्ट “जनकत्व” वृत्ताची राज्य शासनाने घेतली दखल,
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील नगरपंचायतचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने विकास कामांवर विपरीत परिणाम होत असल्याचे वृत्त “जनकत्व” न्युज नेटवर्कने ०८ जुलैला प्रकाशित केले होते. सदरच्या वृत्ताची दखल घेऊन राज्य शासनाने नगरपंचायत देवरी, जिल्हा गोंदियाचे मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना तडकाफडकी एटापल्ली नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून बदलीवर पाठविले असून त्यांनी (ता. ०६ ऑगस्ट) मंगळवारी मध्यानानंतर कार्यालयात रुजू होऊन कारभार स्वीकारला आहे.
नगरपंचायत निर्मितीच्या नऊ वर्षात अकरा महिन्यांचा अपवाद वगळता मुख्याधिकारी पदी प्रभारी अधिकाऱ्यांनीच कारभार सांभाळला असल्याने शहराचा विकास खूंटला असून पूर्णवेळ मुख्याधिकारीचे नियुक्ती होण्याची आवश्यकता असल्याचे जनकत्वच्या बातमीतून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे शहराच्या विकास कामांना ब्रेक लागून नागरिकांना घरकुल, सौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्याला हानिकारक नाली सफाई, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना शासन स्तरावरील लाभाच्या योजना, शैक्षणिक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचीही बाब पुढे आली होती.
नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी प्रणय तांबे यांच्यापुढे नगरपंचायत स्थापनेपासून गेली नऊ वर्षाच्या कालखंडात सुशील कोकणी चार महिने व अजय साळवे सात महिने अशा अकरा महिने दोन पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांचा सुशासनाचा कार्यकाळ वगळता इतर काही प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली बोगसरीत्या काढलेले कंत्राट त्यातून ओरबाळून मिळविलेले कमिशन व भकास झालेल्या विकासाची घडी बसवून खुंटलेल्या विकासाला चालना देण्याचे आवाहन मोठ्या जबाबदारीने पेलावे लागणार आहे. बहू प्रतीक्षेनंतर शासनाने एटापल्ली नगरपंचयातला हक्काचा मुख्याधिकारी म्हणून प्रणय तांबे यांना पाठविल्या बद्दल नागरिकांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.