अतिदुर्गम जाजावंडी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा सन्मान!
एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील अतिदुर्गम मागास, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडीचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रातून या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या दोन शिक्षकांमध्ये बेडके यांचा समावेश आहे. तीन वर्षापूर्वी सिरोंचा तालुक्यातील असरअल्लीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पटकावत गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी शिक्षक बेडके यांचे अभिनंदन केले. बेडके यांच्यासोबत कोल्हापूर येथील सागर बगाडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला. येत्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रमात दिल्ली येथे आयोजित बेडके यांना रजत पदक आणि 50 हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.
एम.ए.,बी.ए्ड्. असलेले मंतैय्या बेडके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आहे. दहा वर्षांपूर्वी बेडके हे या शाळेत रुजू झाले त्यावेळी पाच ते सहा पटसंख्या असलेल्या शाळेत आज शंभरावर विद्यार्थी शिक्षण हेत आहेत. हे विशेष! त्यांना हसतखेळत चांगले शिक्षण मिळावे यासाठी बेडके यांनी विविध उपक्रम राबवितांना स्थानिक ग्रामसभांचा सहभाग व पालकांचेही सहकार्य लाभले आहे. आदिवासी बहुल, मागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावी भागातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार निवड झालेले शिक्षक मैतय्या बेडके यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.