चिकणीच्या उच्च शिक्षित युवक व नागरिकांनी घेतली शांतता सभा!

दंगलखोरांना पाठबळ देणाऱ्या पुढाऱ्यांवर बहिष्कार टाकण्यावर विचारमंथन,

नेर;(यवतमाळ)
तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथे एका दारुड्याच्या खोटारडेपणामुळे झालेल्या वादाने दंगलीचे स्वरूप घेऊन दोन्ही गटातील ३५ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, सामाजिक सलोखा अबाधित रहावा या दृष्टीने नागरिकांककडून सभा घेण्यात आली, यावेळी दंगलखोरांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पक्ष अथवा पुढाऱ्यांवर आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्यावर विचारमंथन करण्यात आले आहे.

तीन दशकांपूर्वी चिकणी गावात अशाच एका वादातून जातीय दंगल घडली होती, त्या दंगलीमध्ये अनेकांची कुटुंबे होरपडून उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी क्षुल्लक कारणाने झालेल्या वादाने जातीय दंगलीचे स्वरूप घेतले होते, दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. यात दोन्ही गटातील अनेकांवर पोलिसांत गुन्हे दाखल होऊन, त्यातील दंगलखोरांना तसेच काही निर्दोषांना कारागृहात डांबले गेले होते, त्या दंगलीची तीव्रता इतकी भयंकर होती की राज्य शासनाच्या आदेशाने गावात पोलीस चौकी उभारून जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन ते तीन महिने संचारबंदी आदेश लागू करावा लागला होता. संचारबंदी दरम्यान नागरिकांना सकाळी व सायंकाळच्या ठराविक वेळेत घराबाहेर पडण्याची मुभा पोलिसांकडून दिली जात होती, त्यामुळे गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमिनी पडीत पडल्या होत्या, तर मजुरांनाही मजुरी करता आली नव्हती, यातून अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे दंगलीत सामील दोन्ही गटातील अनेक तरुण पोलीस कारवाहीच्या भीतीने शिक्षण अर्ध्यावर सोडून गावातून पसार झाले होते. यातील काही तरुण आजपावेतो गावात परतले नाहीत व त्यांचा काही थांगपत्ताही लागलेला नाही. त्यामुळे अशा समाज विघातक घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, गावात शांतता नांदावी यासाठी गावातील उच्च शिक्षित युवक व सुजाण नागरिकांनी (ता. १९ सप्टेंबर) गुरुवारी सायंकाळी शांतता सभा घेऊन, गुन्हा केलेला नसतांना एका दारुड्याच्या खोटरडेपणातून समाजातील निर्दोषांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याची व दंगलखोरांना राजकीय पाठबळ देणाऱ्या पुढाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्यावर गंभीर चर्चा करण्यात आली आहे.

चिकणीच्या एका वराच्या अमरावती येथील लग्न समारंभात (ता.१५ सप्टेंबर) रविवारी सुनील बाबूलाल राठोड याने दारू पिऊन गोंधळ घातला होता. लग्न समारंभ आटोपून वरात सायंकाळी चिकणी गावात परत पोहचल्यावर गोंधळ घालणाऱ्या सुनील राठोड याला मिलिंद मेश्राम यांनी समाज देऊन घरी पोहचवून दिले होते. मात्र सुनील राठोड याने त्याच्या समाजातील पुढारी व नातेवाहिकांना लग्नातील वऱ्हाड्यांनी त्याला जबर मारहाण केल्याची खोटी बतावणी केली होती. यावरून त्या गटाने लाठ्या काठ्यांनी लग्न समारंभ ठिकाणी जाऊन वऱ्हाड्यांवर हल्ला चढविला होता. यावेळी दोन्ही गटात सामान्य हाणामारी झाली होती. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री ३५ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगलखोर गटाला कोणत्या तरी राजकीय पक्ष पुढाऱ्यांचे पाठबळ असण्याचा संशय दुसऱ्या गटाला आहे. त्यामुळे क्षुल्लक वादाला दंगलीचे स्वरूप देणाऱ्या दंगलखोरांना पाठीशी घालणाऱ्यांवर आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याचे विचारमंथन शांतता सभेत करण्यात आले आहे.

सदरच्या दोन गटातील वादावर पोलीस निरीक्षक राहुल आठवले, बिट जमादार गजानन पत्रे व नितेश राठोड यांनी सामंजस्याने चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात मौलिक भूमिका बजावली आहे. हे विशेष!

शांतता सभा प्रसंगी सिद्धार्थ लांजेवार, दिनेश मडके, प्रदीप कापशिकर, कामराज गोंडाने, विकास कापशिकर, प्रतीक लांजेवार, मिलिंद वासनिक, सुनिल गजभिये, रविंद्र देशभ्रतार, नितीन सुखदेवे, मंगेश बोरकर, भीमराव कापशिकर, कुंदन देशभ्रतार, पियुष सुखदेवे, भुषण भगत, सुमेध कापशिकर, धीरज गजभिये, प्रद्धूमन शेंडे, सौरभ सुखदेवे, गौरव मेश्राम, सम्यक भगत, निकेतन कापशिकर, आदित्य वासनिक, सुनील बोरकर, अमोल दहिवले व नागरिक मोठ्या संख्येने हजार होते.