अहेरीचे राज घराने सत्तेच्या सारिपाठात व्यस्त, जनता समस्यांनी त्रस्त!

कार्यकर्ता मेळाव्यातून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची सडकून टीका!

अहेरी;(गडचिरोली)
गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे. विकासाच्या बाबतीत मात्र प्रचंड असंवेदनशीलता दिसून येत आहे. क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे. स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या सारिपाठात व्यस्त असून क्षेत्रांतील जनता समस्यांच्या विळख्यात वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना वडेट्टीवार यांनी अहेरीच्या राज घरण्यावर सडकून टीका केले आहे.

आयोजित मेळावा प्रसंगी खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, बानय्या जंगम, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, रमेश गंपावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेत एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे, तर दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकली जात आहे, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात जसा असल्याची टीका केली, निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनतेनेच धडा शिकविला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या विधानसभा क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा विकला जाणाऱ्या अवैध व्यावसायिक माफियांचा करोडो रुपये किंमतीचा साठा प्रशासनाकडून पकडला जातो मात्र कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्याच्या कायदाव व सुव्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुलीमध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित कटाचा भाग असल्याचीही टीका केली आहे. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार कराण्याचे आवाहन खासदार डॉ नामदेव किरसान यांनी केले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनतेच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळावा प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.