राज्य शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना नवी ओळख.
गडचिरोली;
जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांना स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची नावे देऊन नामकरण करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आलेल्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली नागेपल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिवंगत राजे विश्वेश्वराव आत्राम, एटपल्लीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय राजाराम जम्बोजवार यांचे, देसाईगंजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला इंदूताई नाकडे यांचे, चामोर्शीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला विठोबाजी लठारे यांचे, कुरखेडाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वीर नारायनसिह उईके यांचे, कोरची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला जगदेवराव उराव यांचे व धानोराच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला टिपगड गुरुबाबा यांचे, अशा सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची नावे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत युवकांना या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. अशा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे असा आहे.
राज्य शासनाने मागास, अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलप्रभावी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या मान्यवरांची नावे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दिल्यामुळे त्यांच्या कार्याचा सम्मान झाला आहे. शासनाच्या अशा ऐतिहासिक निर्णयाने विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून राज्य शासनाचे आभार मानले जात आहे.!