उपविभागीय अधिकारी नयन गोयल यांना निवेदन, ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्र सुरू करण्याचीही केली मागणी.
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील कसनसुर गावाच्या परिसरातील सतरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शंभराहून अधिक गावांचा विकास गतिमान करण्यासाठी कसनसून या गावाच्या ठिकाणी तालुका निर्माण करण्याची मागणी कसनसुर ग्रामपंचायत सरपंच कमल हेडो, वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी, जवेलीचे सरपंच आलिशा गोटामी, मानेवाराचे उपसरपंच देविदास मट्टामी, ग्रामसभा अध्यक्ष सुधाकर गोटा, सचिव राजू गोमाडी व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी नयन गोयल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दुसऱ्या निवेदनात ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्र सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मागास, अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी कसनसुर ग्रामपंचायत सभोवतालच्या परिसरातील हालेवारा, वाघेझरी, कोटमी, चोखेवाडा, जवेली (बूज.) कोहका, जारावंडी, सोहगाव, सरखेडा, दिंडवी, वळसा (खुर्द.), सेवारी, घोटसुर, मानेवारा, जवेली (खुर्द.), व मेढरी अशा सतरा ग्रामपंचायत क्षेत्रातील शंभराहून अधिक गावे विकासापासून कोसो दूर असून अविकसित गावांचा विकास साधण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून कसनसुर येथे तालुका निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.
सध्याचे एटापल्ली हे तालुका मुख्यालय कसनसूरपासून तीस किमी अंतरावर तर परिसरातील अनेक गावे साठ ते सत्तर किमी अंतरावर आहेत, तालुका मुख्यालयापासून दूरचे अंतर व गाव खेड्यांपर्यंत न पोचलेले रस्ते, दळणवळण साधनांचा अभाव त्यामुळे परिसरातील गाव खेड्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी अशा मूलभूत व भौतिक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भ योजना अंतर्गत मंजूर असलेले ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीचेही निवेदन यावेळी नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे. कसनसुर व परिसरातील शंभर ते दीडशे गावांत वीज पुरवठ्याची गंभीर समस्या असून शेतकऱ्यांना शेती उत्पादन घेतांना विद्युतपंप चालविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास करतांना तसेच जनसामान्यांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्युत उपकरणे वापरतांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे कसनसुर येथे मंजूर असलेले व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तृट्यांची पूर्तता झालेले ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र सुरू करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी नयन गोयल यांना दिलेल्या दुसऱ्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.
परिसरातील नागरिकांच्या समस्या व अविकसित गावांचा विकास गतिमान करण्यासाठी कसनसुर तालुका निर्माण करण्याची व मंजूर ३३ के. व्ही. विद्युत पुरवठा उपकेंद्र सुरू करण्याची मागणी, उपविभागीय अधिकारी नयन गोयल यांचेकडे कसनसुर ग्रामपंचायत सरपंच कमल हेडो, वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी, जवेलीचे सरपंच आलिशा गोटामी, मानेवाराचे उपसरपंच देविदास मट्टामी, ग्रामसभा अध्यक्ष सुधाकर गोटा, सचिव राजू गोमाडी व नागरिकांनी निवेदनातून केली आहे. परिसरातील संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.