News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा येथे १५ एप्रिल ते ३० मे दरम्यान या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असुन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापुन सदर कॅम्पचे उदघाटन आज करण्यात आले. Free summer camp
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुट्यांचा आनंद निश्चितच घ्यावा, पूर्वी सुट्यांमध्ये गावी जाण्याचा आनंद असायचा परंतु कोरोना कालावधीने अनेकांचा कल टीव्ही कार्टुन अथवा मोबाईलकडे वळला. यातुन मुलांना बाहेर काढायचे असेल तर अधिकाधिक समर कॅम्पचे आयोजन व्हायला हवे.शासनाद्वारेही खेळ क्षेत्राला प्रोत्साहन म्हणुन निधी प्राप्त होणार आहे ज्याद्वारे शाळांमध्ये उपलब्ध मैदाने ही खेळाची मैदाने म्हणुन विकसित होणार आहेत. सर्वांगीण विकासासाठी समर कॅम्पमध्ये चित्रकला, कॅरम, नृत्य, संगीत इत्यादी खेळ व कलांचा समावेश करण्याच्या सुचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या. Chandrapur municipality school
समर कॅम्पची वेळ दररोज सकाळी ७ ते १०.३० वाजेपर्यंत असुन यात यात चेस,व्हॉलीबॉल,बास्केट बॉल,बॅडमिंटन इत्यादी खेळ तज्ञ व्यक्तींद्वारे निःशुल्क शिकविले जाणार आहेत. सकाळी ७ ते ७.३० योग वर्ग, ७.३० ते ९.३० विविध खेळ व ९.३० ते १०.३० या कालावधीत इंग्लीश स्पिकिंगची तयारी विद्यार्थ्यांकडुन करवुन घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता ५ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा,इयत्ता ८ वी साठी एनएमएमएस परीक्षा,१० वीची परीक्षा या विविध स्पर्धांची तयारी सुद्धा करवुन घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनींनी संचालन तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. बावणे, उपाध्यक्ष चिंचोलकर, शिक्षक वृंद, व मोठया प्रमाणावर पालक – विद्यार्थी उपस्थीत होते.