चंद्रपूर जिल्ह्यातील या पतसंस्थेत 7 कोटींच्या रकमेची अफरातफर

कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण

News34 chandrapur

चिमूर/चंद्रपूर – चिमूर शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्थेत 7 कोटी 66 लाख रुपयांची अफरातफर झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

पतसंस्थेमधील माजी मानद सचिव, दैनिक एजंट, मुख्य लिपिक यांनी बनावट खाते व नात्यातील लोकांच्या खात्यात 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2021 या कालावधीत सदर रक्कम वळविण्यात आली.

बँकेच्या वार्षिक अहवालात सदर बाब उघडकीस आल्याने खाते धारक हतबल झाले आहे, या पतसंस्थेत 4 हजारांच्या वर खातेधारकांचे पैसे अडकले आहे.

17 एप्रिलला याबाबत खातेदारांनी पत्रकार परिषद घेत आरोपीना तात्काळ अटक करीत कारवाई करण्याची मागणी केली.

या पतसंस्थेत सदर रकमेची अफरातफर करणारे अरुण मेहरकुरे, रेखा मेहरकुरे, अतुल मेहरकुरे, उज्वला मेहरकुरे, अरविंद मेहरकुरे, अमोल मेहरकुरे, मारोती पेंदोर, आशिष माट्टेवार, प्रियंका माट्टेवार, सचिन वाघे, संजय कामडी, सुषमा शेंडे यांचा समावेश आहे.

9 वर्षाच्याया कालावधीत यांनी तब्बल 7 कोटी 66 लाख 90 हजार 510 रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका उपलेखापाल यांच्या अहवालात लावण्यात आला.

याबाबत 30 सप्टेंबर 2022 ला चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र आरोपी आजही पोलिसांच्या अटकेबाहेर असल्याची माहिती खातेधारकांनी दिली.

खातेधारकांकडून दैनिक जमा रक्कम, कर्ज अश्या अनेक नियमबाह्य पद्धतीने गुन्हा दाखल झालेल्या आरोपीने पैसे इतरत्र वळविले.

कर्जाच्या परतफेडीची तारीख सुद्धा बोगस पध्दतीने वाढविण्यात आली आहे, विशेष बाब म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा रक्कम इतरत्र वर्ग करण्यात आली होती.

याबाबत काही महिन्यांपूर्वी पतसंस्थेचे अध्यक्ष मांढरे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीना अटक करण्याची मागणी केली होती, मात्र सध्या हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने अद्याप कुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली नाही.

आता पतसंस्थेत प्रशासक बसविण्यात आला असून सर्व व्यवहार बंद करण्यात आले, ज्यांनी पैसे जमा केले ते रोज पतसंस्थेत जाऊन चकरा मारत आहे.

यावर तात्काळ कारवाई आरोपींवर व्हावी व आम्हाला न्याय देत आमच्या कष्टाचे पैसे परत द्या अशी मागणी खातेधारक अजय चौधरी, सुनीता कामडी, प्रशांत सूर्यवंशी, भारती दडमल यांनी केली आहे.

आमच्या मागण्या 8 दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याची माहिती खातेधारकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.