News34 chandrapur
चंद्रपूर : सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य मात्र अनेक ठिकाणी या ब्रीदवाक्याच्या उलट काम होत आहे, गंभीर गुन्ह्यात फिर्यादीची दखल घेतल्या जात नाही, त्यामुळे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी यांची हिम्मत वाढत असते. या प्रकाराला कुठे न कुठे पोलीस विभाग कारणीभूत ठरतो असंच एक उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून समोर आले आहे.
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांनी महिलेला अमानुष मारहाण केली. याची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात महिला गेली असता थातुरमातुर गुन्ह्यांची नोंद केली तथा तिची वैद्यकीय तपासणी केली नाही. यामुळे निर्ढाववलेल्या आरोपींनि तीन दिवसांनी पुन्हा तिला मारहाण केली. पहिल्या मारहाणीतच तिच्या मेंदूत गंभीर इजा झाली होती आणि आरोपींनि पून्हा मारहाण केल्याने दुसऱ्या दिवशी तिने अंतिम श्वास घेतला. पोलिसांनी आरोपींना पकडले नाही, उलट त्यांची पाठराखण करत आम्हालाच धमकविण्यात आले. Warora police
पोलिसांच्या या भूमिकेमुळे महिलेचा नाहक जीव गेला असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबाने केला आहे. एवढेच नव्हे तर तिच्या मृत्यूनंतर देखील आरोपी मोकाट फिरत आहेत. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा महिलेचे पती दिलीप गौळकार आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला आहे. Chandrapur police
सविस्तर वृत्त असे की मृतक नंदा दिलीप गौळकार ह्या वरोरा येथील नागरी येथील रहिवासी होत्या. 25 मार्चला नंदा ह्या सारवण करीत असताना त्यांना आरोपी पुंडलिक गौळकार आणि त्याचा मुलगा शुभम गौळकार यांनी आमच्या घराजवळून जाऊ नको असे धमकावून सांगत तिला मारहाण सुरू केली. आपल्या पत्नीची आरडाओरड ऐकताच पती दिलीप गौळकार धावून गेले. त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी त्यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. याची तक्रार दाखल करण्यासाठी हे दाम्पत्य वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. यावेळी तेथील कर्मचारी याने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तक्रार घेत नसाल तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जातो असे म्हटल्यावर अखेर त्यांची तक्रार घेण्यात आले. मात्र भादवि कलम 323, 504, 506 अशा थातुरमातुर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जे तक्रारीत सांगितले ते नमूद करण्यात आले नाही, पत्नीला जास्त मार लागला असून दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना दमदाटी केली. संगणकात पत्नीला जास्त मार लागला नसून दवाखान्यात जाऊ इच्छित नाही असे नमूद करण्यात आले. पोलिसांनी दमदाटी करत त्यांना या कागदावर सही देण्यास भाग पाडले. मारहाण करणारे आरोपी मोकाटच होते. पोलिसांचा कुठलाही धाक नसल्याने याच आरोपींनी 29 मार्चला फिर्यादी महिलेच्या घरी घुसून पुन्हा मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली असता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पती दिलीप गौळकार हे तिची रिपोर्ट दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी आधी रुग्णालयातुन मेमो येऊ दे त्यानंतर तक्रार दाखल करतो असे सांगितले.
पत्नीची तब्येत बिघडल्याने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. डोक्यावर झालेल्या प्रहारामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात देखील डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तिचा मृत्यू हा पोलिसांच्या हलगर्जीपणा आणि असंवेदनशीलतेमुळे झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला मात्र आरोपी अद्याप मोकाट आहेत, आम्हाला न्याय हवा अन्यथा आम्ही पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषण करू असा इशारा पत्रकार परिषदेत मृतक महिलेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
हातापायाने मारहाण झाल्याने डोक्याला इजा होते का याचा तपास सुरू
या संदर्भात वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काचोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र हातांनी, पायांनी मारहाण केल्याने डोक्याला गंभीर इजा होऊ शकते का याचा तपास आम्ही करतो आहो, त्यामुळे आरोपींना अद्याप अटक केली नाही असे त्यांनी सांगितले.