चंद्रपुरात सुरू झाला “आपला दवाखाना”

News34 chandrapur

चंद्रपूर  – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे लोकार्पण १ मे रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.चंद्रपूर मनपा क्षेत्रात मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आंबेकर ले आऊट ,भावसार चौक येथील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.  Aapla dava khana

याप्रसंगी बोलतांना आमदार महोदय म्हणाले की, छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी होणार ताण कमी करण्याच्या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन सदर हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरु करण्यात आली आहे.   आरोग्य वर्धिनी केंद्रांचे रूपांतर टप्याटप्याने आपला दवाखान्यात करण्यात येणार आज मनपा हद्दीत १२ आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत यापैकी १० केंद्रे ही किरायाच्या इमारतीत २ केंद्रे ही मनपाच्या जुन्या शाळेत चालविण्यात येत आहेत.मनपाची आरोग्य वर्धिनी केंद्रे ही शासकीय इमारतीतच असावी, यासाठी जो काही निधी लागेल त्याची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. Chandrapur municipality

जसे घरापर्यंत वीज,पाणी या सुविधा दिल्या जातात त्याच धर्तीवर घराच्या जवळ दवाखाना असावा या दृष्टीने आरोग्य केंद्राचे जाळे उभारले जात आहे. संपुर्ण प्रशासन या कमी लागले असुन तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे सेवा देण्यात येणार असल्याने यातील सुविधा निश्चितच दर्जेदार असतील. महिलांसाठी १ विशेष आरोग्य केंद्र असावे व आरोग्य वर्धिनी केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  Aarogya card

उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले की,आरोग्य सुदृढ नसले तर व्यक्ती काम करू शकत नाही पर्यायाने मनुष्यबळ वाया जाते.सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा त्यांच्या कामाच्या वेळेचा विचार करून उपलब्ध करून देण्याचा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कष्टकरी श्रमिकांना अनेकदा आपल्या कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या आपला दवाखानाची वेळ दुपारी २ पासून रात्री १० वाजेपर्यंत लोकांना सुविधाजनक दिलासा देणारी असल्याचे ते म्हणाले.

१५ व्या वित्त आयोग अंतर्गत पुढील ५ वर्षात प्राथमिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केला जात असुन ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम केल्या जात आहेत. चंद्रपूर महानगरपालिकांतर्फे सद्यस्थितीत १२ आरोग्य वर्धिनी केंद्र चालविले जात आहेत. यातील एका आरोग्य वर्धिनी केंद्राचे रूपांतर आपला दवाखान्यात करण्यात आले आहे.

सर्व आरोग्य वर्धिनी केंद्रे व आपला दवाखाना हे मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांशी संलग्न असणार आहेत. यात निःशुल्क तपासणी,औषधे व ३० प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांची सेवा देण्यात येणार आहेत. याप्रसंगी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

७ प्रकारच्या तज्ञ सेवा –
१. फिजिशियन
२. स्त्री रोग व प्रसुती तज्ञ
३. बालरोग तज्ञ
४. नेत्र रोग
५. त्वचा रोग
६. मानसोपचार
७. कान नाक घसा तज्ञ

उपलब्ध अधिकारी /कर्मचारी –
१. वैद्यकीय अधिकारी
२. स्टाफ नर्स
३. बहुउद्देशीय कर्मचारी
४. मदतनीस

उद्दिष्टे –
१. दवाखाने आधुनिक तंत्रज्ञाने स्मार्ट बनविणे
२. सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा
३. विविध रोगाच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण
४. शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी सुविधा

उपलब्ध सुविधा –
१. बाह्य रुग्ण सेवा
२. मोफत औषधोपचार
३. मोफत तपासणी
४. टेली कन्सल्टेशन
५. महिन्यातुन निश्चित दिवशी नेत्र तपासणी
६. एक्स रे साठी संदर्भ सेवा
७.गर्भवती मातांची तपासणी
८. लसीकरण