News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मांगली या गावात असलेल्या जगन्नाथ बाबा मठ येथे 2 जेष्ठ नागरिकांची 22 मार्चच्या रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, तब्बल दीड महिन्यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यात यश मिळाले असून या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. Double murder
सदर घटना ही 22 मार्च च्या रात्रीची असल्याचा अंदाज होता, जगन्नाथ बाबा मठ येथे अज्ञात दरोडेखोरांनी दानपेटी चोरण्यासाठी प्रवेश केला असता तिथे झोपून असलेले 72 वर्षीय बापूजी खारकर व 75 वर्षीय मधुकर खुजे यांच्यावर सब्बलने वार करीत हत्या करण्यात आली होती.
मृतक 72 वर्षीय बापूजी खारकर यांचे शेत हे जगन्नाथ बाबा मठाजवळ होते, त्यामुळे ते शेतीची राखणदारी करणे सोप्पे व्हावे यासाठी मठात झोपत होते, खारकर यांनी शेतीवर कामे करण्यासाठी मधुकर खुजे ला सोबत ठेवले होते.
22 मार्चला रात्री शेतीवरून परत आलेले खारकर व खुजे हे मठात येऊन आराम करू लागले, मध्यरात्री च्या सुमारास अज्ञातांनी मठात प्रवेश करीत बाजूला ठेवलेली सब्बल उचलत दोघांवर वार केला, या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
या दुहेरी हत्याकांडाने पोलिसांसमोर आरोपीना पकडण्यासाठी मोठे आव्हान होते, सदर घटनेनंतर घटनास्थळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी तपास सुरू केला होता, मात्र त्यांच्या हाती काही लागले नव्हते, खासदार व आमदार धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची भेट घेत या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करावा अशी मागणी केली होती.
एक आव्हान म्हणून पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास बारकाईने सुरू केला, यावेळी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली होती, सदर घटनास्थळी आरोपीचा मोबाईल सक्रिय असल्याची माहिती मिळाली, मोबाईल क्रमांक मिळाला, आरोपीवर पाळत ठेवण्यात आली, त्यांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते, 6 मे ला या हत्याकांडात चंद्रपुरातील शामनगर निवासी 42 वर्षीय मनी ला अटक करण्यात आली.
मनी हा हार्डकोर गुन्हेगार आहे, त्याच्यावर घरफोडी सह तब्बल 50 गुन्हे दाखल आहे, दुहेरी हत्याकांड केल्यावर मनी व त्याचे सहकारी दुसऱ्या जिल्ह्यात पळाले होते.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली, आता या गुन्ह्यात 2 आरोपी अजूनही पसार आहे.
घटना कशी घडली?
22 मार्च ची ती रात्र मनी व त्याचे 2 साथीदार भंगार चोरण्यासाठी भद्रावती येथे दाखल झाले, तिथे त्यांना काही न मिळाल्याने तिघांनी बिर्याणी घेतली व भद्रावती येथील मांगली गावात दाखल झाले, मध्यरात्र झाली असताना रस्त्यावर कुणी नव्हते, त्यावेळी मांगली गावातील रस्त्यावरून जात असताना त्यांना मठ दिसले, त्यांना वाटलं दानपेटी मध्ये मोठी रक्कम मिळेल म्हणून त्यांनी मठात प्रवेश केला.
तिघांनी दानपेटी उचलली पण तितक्यात तिथे झोपत असलेले बापू खारकर व मधुकर खुजे यांना जाग आली, अचानक दोघे जागी झाल्याने आता ते आरडाओरडा करतील या भीतीने त्यांच्यावर सब्बलीने वार केला, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर दानपेटी मधील 2 हजार रुपये काढत त्यांनी दानपेटी बाजूला फेकली, त्यांनतर तिथेच तिघांनी बिर्याणी खाल्ली, व निघून गेले, विशेष म्हणजे तिघे आरोपी त्यावेळी नशेत होते. आरोपी चोरी करण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनाने भद्रावती येथे दाखल झाले होते.
आपल्या हातून दोघांची हत्या झाली असे समजल्यावर तिघांनी जिल्ह्यातून पळ काढला, आरोपी स्थानिक नसल्याने आधी पोलिसांना काही सुगावा लागला नाही मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या चमू ने अथक परिश्रम करीत या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. आरोपीवर कलम 302, 458, 460, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपी मनी ला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, सहायक पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, सहायक पोलिस अधीक्षक सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, सपोनि जितेंद्र बोबडे, सुधीर वर्मा, अजित देवरे, विशाल मुळे, पोउपनी विनोद भुरले, अतुल कावळे, अमोल कोल्हे, अमोल तुळजेवार, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, नितीन साळवे, प्रकाश बलकी, मुजावर अली यांनी केली.