चंद्रपुरात घर, बंदूक आणि विनयभंग

जीवितास धोका

News34 chandrapur

चंद्रपूर : घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून घर खाली करण्यासाठी वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली जात असून जातीवाचक शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप पीडित महिलेने श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. मात्र, केवळ गुन्हा दाखल करून आरोपीला मोकळे सोडण्यात आल्याने आरोपीपासून जीवितास धोका असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिला राजीव गांधी नगरातील मॅग्झीन गोदामसमोर मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. पहिला पती सोडून गेल्याने तिने दुसरे लग्न केले. दुसरा नवरा हा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. ती एकटीच चंद्रपुरातील घरी वास्तव्यास आहे. दरम्यान, तिच्या घराशेजारी राहणारा समीर अब्दुल सत्तार हा पीडितेला घर खाली करण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याची तक्रार तिने रामनगर पोलीस ठाण्यात केली.

बंदूक छातीला लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सत्तारविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, थातूरमातूर चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. समीर सत्तार हा गुंडप्रवृत्तीचा असून, परिसरात त्याची दहशत असल्याचा आरोप महिलेने केला असून, जीवितास धोका असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे.

तो म्हणतो मी तडीपार?

सत्तार हा स्वत: तडीपार असल्याचे सांगतो. शिवाय त्याच्याकडे बंदुकीसारखे शस्त्र असल्याचे पीडितेने बयाणात सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्या घराची साधी झडतीही घेतली नाही. त्यामुळे भविष्यात त्याच्यामुळे जीवितास धोका असून, त्याला अटक करून कठोर कारवाईची मागणी पीडित महिलेने केली आहे.