News34 chandrapur
चंद्रपूर /यवतमाळ- चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या विविध क्षेत्रामधील 145 कामगारांना वणी क्षेत्रात डंपर ऑपरेटर करीता नियुक्ती आदेश जारी करण्यात आले होते मात्र रुजू होण्यापूर्वीच वेकोलि मुख्यालयाने हे आदेश रद्द केल्याने संतप्त कामगारांनी पूर्व गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
या प्रकरणात हस्तक्षेप करुन हंसराज अहीर यांनी वेकोलि CMD यांचेशी चर्चा करुन कामगारांचा हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला.
वेकोलि मुख्यालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वेकोलि क्षेत्रातील कामगारांव्दारे वेकोलि वणी क्षेत्रात HEMM (डंपर ऑपरेटर) कार्य करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी शेकडो कामगारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करुन मुख्यालयाकडे आवेदन सादर केले त्यानुसार 145 कामगारांचे HEMM करीता निवड करुन नियुक्ती आदेश सुध्दा देण्यात आले. परंतु मुख्यालयाने लागलीच हे आदेश रद्द केले. त्यामुळे वणी, बल्लारपूर, चंद्रपूर, माजरी, वणी-नॉर्थ क्षेत्रातील संबंधित कामगारांमध्ये संताप पसरुन त्यांनी दि. 20 मे, 2023 रोजी हंसराज अहीर यांची निवासस्थानी भेट घेवून त्यांचेसमोर आपली व्यथा मांडली.
या संदर्भात हंसराज अहीर यांनी वेकोलिचे CMD यांचेशी चर्चा करुन या सर्व कामगारांना नियुक्ती आदेशानुसार वणी क्षेत्रात रुजू करुन घेण्याचे निर्देश दिले. याबाबत CMD यांनी आपल्या सुचनेनुसार कोणत्याही कामगारांवर अन्याय केला जाणार नाही मात्र सदर नियुक्ती आदेश देण्यापूर्वी काही त्रुटी निर्माण झाल्याने आदेश रद्द करण्यात आले या नियुक्ती दिलेल्या सर्व कामगारांची ट्रायल घेवून व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन वणी क्षेत्रात नियुक्त करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल अशी माहिती CMD यांनी अहीर यांच्याशी चर्चेदरम्यान दिली.
हंसराज अहीर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, धनराज देठे, शुभम काटवले, जांभुळकर, देवेंद्र उपरे, प्रविण मासिरकर, रमेश पोटे, विनायक पावडे, विशाल राजुरकर, गणपत बोढे यांचेसह अनेक वेकोलि कामगार उपस्थित होते. सीएमडी यांचेशी झालेल्या चर्चेनंतर सर्व कामगारांनी समाधान व्यक्त करीत न्याय मिळवून दिल्याबद्दल हंसराज अहीर यांचे आभार मानले.