चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात फूट?

गोळीबार प्रकरणानंतर कांग्रेस पक्षात उभी फूट

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा कांग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार नंतर कांग्रेसच्या ग्रामीण उत्तर भारतीय संघाचा जिल्हाध्यक्ष राजबिर यादव याला अटक करण्यात आली.

यानंतर चंद्रपूर कांग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरू झाले, एकीकडे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून नागरिक व कांग्रेसला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्ष विखुरल्या जात आहे.

संतोष रावत गोळीबार प्रकरणी आरोपी राजबिर यादव यांनी रावत यांना वेकोली मध्ये काही युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत पैसे घेतले होते अशी माहिती यादव यांनी पोलिसांना दिली, पैसे परत न दिल्याने रावत यांच्यावर गोळीबार केला अशी कबुली यादव यांनी दिली आहे.

या प्रकरणानंतर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी मध्यवर्ती बँकेच्या संचालकावरती धक्कादायक आरोप करीत खळबळ उडविली आहे.

रामू तिवारी यांचा आरोप काय?

 

रामू तिवारी यांनी म्हटले की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती करण्यास मंजुरी मिळावी म्हणून विद्यमान संचालक मंडळाने शासनस्तरावर अनेक प्रयत्न चालविले होते. परंतु, भरती प्रक्रिया राबविण्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानासुद्धा बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील अनेक युवकांकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर पैसे घेतले, असल्याचीही चर्चा आहे. नोकरी न मिळाल्याने भविष्यात पुन्हा अशी घटना जिल्ह्यात घटना घडू नये, यासाठी या सर्व संचालकांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही तिवारी यांनी कळविले आहे.

तिवारी यांच्या आरोपानंतर मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी सरळ रामू तिवारी यांना कांग्रेस पक्षातून बडतर्फ करावे अशी मागणी केली असून याबाबत लवकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना भेटून त्यासंबंधी तक्रार देणार असल्याचे बँक संचालकांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.

बँक संचालकांनी काय म्हटलं?

बँक संचालक संदीप गड्डमवार व विजय देवतळे यांनी जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला असून फिर्यादी रावत यांनी आरोपीची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी केली मात्र रामू तिवारी यांनी बँक संचालकांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी म्हणजे तपास यंत्रणेची दिशाभूल करणे होय.

रामू तिवारी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय? सहकार क्षेत्र काय याबाबत काही कळतं का? कुणी सांगितलं म्हणून काहीही मागणी करायची, तिवारी यांच्या मागे दुसराचं बोलविता धनी आहे.

जिल्हा बँकेत मागील 20 वर्षांपासून कांग्रेस पक्षाचे 15 संचालक कार्यरत आहे, त्यामुळे पक्षनिष्ठा काय हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे, मात्र तिवारी यांच्याकडून असे आरोप म्हणजे रावत यांच्या आरोपीची पाठराखण करणे होय.

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात निष्ठावंत कोण? याबाबत सर्व काही माहिती आहे, मात्र तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप करणे म्हणजे कांग्रेसवर आरोप करणे होय. त्यामुळे या प्रकरणात कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कांग्रेस पक्षावर कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांमार्फत होत असलेल्या आरोपाची दखल घेत रामू तिवारी यांना पक्षातून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

गोळीबार प्रकरणानंतर कांग्रेस पक्षात फूट पडली असून कांग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळली आहे, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्षाला याचे परीणाम भोगावे लागतील.

आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक डॉ. विजय देवतळे, रविंद्र शिंदे, संदीप गड्डमवार, पांडुरंग जाधव, संजय तोटावार, राजेश रघाताटे, ललित मोटघरे व प्रकाश बनसोडे यांची उपस्थिती होती.