भावासाठी बहीण व वडील बाहेर निघाले आणि घडला भीषण अपघात

चंद्रपुरात घडला भीषण अपघात

News34 chandrapur

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सर्वसाधारण कुटुंबातील मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या भवितव्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बी.एस.सी.द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारी मुलगी व वडील सोबत दुचाकीने निघाले. मात्र पुढे भीषण अपघात घडला आणि होत्याचे नव्हते झाले.

बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जबरदस्त धडक दिली. या धडकेत बी.एस.सी.द्वितीय वर्षाला शिकत असलेली विसापूर येथील हुशार विद्यार्थिनी ठार झाली.तर वडील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही मनाला चटका लावणारी घटना गुरुवार ( दि.१५) रोजी दुपारी ४.२५ वाजता बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर घडली.

वेदांती युवराज चिंचोलकर ( वय -२१) रा.विसापूर ता.बल्लारपूर असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिचे वडील युवराज माधव चिंचोलकर असे गंभीर जखमीचे नाव आहे.

वेदांती व तिचे वडील युवराज चिंचोलकर हे दुचाकी क्रमांक एम.एच.-34/ बी.एन.-5848 ने बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत कुणाल च्या ११ वीच्या प्रवेशासाठी गेले. तेथील काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूर कडे वळले. दरम्यान त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहन आले. चारचाकी वाहनाच्या चालकाच्या निर्दयीपणामुळे दुचाकीला जबरदस्त धडक बसली.

अपघातात वेदांती व युवराज रस्त्यावर पडले.दुचाकी फरफटत काही अंतर गेली. अर्ध्या तासाने रुग्णवाहीका आली. रुग्णवाहिकेतून वेदांती व युवराज ला वैद्यकीय शासकीय रुग्णालय ,चंद्रपूर येथे उपचारार्थ आणले. त्यावेळी वेदांती हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेदांती चिंचोलकर ही हुशार व मनमिळावू विद्यार्थिनी होती. ती चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बी.एस.सी.द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती.भाऊ कुणालचे चांगले शिक्षण व्हावे,म्हणून ती वडिलांसोबत प्रवेश घेण्यासाठी गेली.मात्र कधीच घरी परत येण्यासाठी नाही. तिच्या अपघाती निधनाबद्द्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.