कांग्रेस नेते संतोष रावत यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

आरोग्य सुविधा अद्यावत करा

News34 chandrapur गुरू गुरनुले

 

मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली असून शेतकरी, कामगार, महिला व बालकांना आरोग्य केंद्रात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात साधन व सुविधांची वाणवा आहे. वाढत्या नवनवीन आजारांच्या तुलनेत आरोग्य केंद्रे अद्ययावत नाहीत.

तेव्हा जिल्हा प्रशासनाने ताबडतोब जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केली आहे.

चंद्रपूर हा जसा शेतीपूरक जिल्हा आहे तसाच तो औद्योगिक जिल्हा आहे. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर तर औद्योगिक परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या काळात आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात महागळी झाली आहे. गोरगरीब, गरजू वर्ग हा ग्रामीण, तालुका तथा जिल्हा आरोग्य केंद्रात निःशुल्क उपचाराकरिता जातो. मात्र या शासकीय आरोग्य केंद्रात त्यांना पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे ग्रामीण जनता व कामगार वर्ग आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहे व त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. तालुका स्तरावर असलेल्या रुग्णालयामध्ये रुग्णांना आवश्यक त्या सोई तात्काळ उपलब्ध होत नसल्याने उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णाला लगेच रेफर टू चंद्रपूर करीत असतात. मग तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालयाचा उपयोग काय. अत्यावश्यक असणाऱ्या आणि मानवी जीवनाशी निगडित असलेल्या आरोग्य विभागात सर्व रोगांचे उपचार करणारे तज्ञ डाक्टर व कर्मचारी यांचे पदे शासनाने त्वरित भरावे जेणे करुन रुग्णालयात आलेले रुग्ण समाधानी होतील अशी मागणी सुद्धा रावत यांनी केली आहे.

 

जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी महिला येतात मात्र सिझेरीअन व्यवस्था नसल्याचे कारण सांगून रेफर टू केले जाते. कधी साप चावला, कुत्रा चावला तरी त्याचे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. अपघाती मृत्यू नंतर छवविच्छेदनाकरीता तात्कळत रहावे लागते. आवश्यक औषधांचा तुटवडा असतो. दिवसेंदिवस नवनवीन आजार वाढत असल्याने, त्याचे निदान करण्याचे तथा प्राथमिक उपचार करण्याची सुविधा नाही.

 

जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात अनुदान तत्वावर असलेले डॉक्टर आहेत. बरेचदा डॉक्टर वेळेवर रुग्णालयात येत नाहीत. नर्स सुद्धा उपलब्ध नसते. गंभीर रुग्ण आरोग्य केंद्रात येतात मात्र तिथे डॉक्टर व नर्सच नसतात. काही डॉक्टरांना दुसरीकडे पाठविले जाते.परिणामी उपचाराला उशीर झाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

या सर्व समस्येची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून पावले उचलावीत. समोर पावसाळा आहे. आजाराच्या समस्या वाढीस लागेल. त्यामुळे ताबडतोब ग्रामीण व शहरी शासकीय आरोग्य केंद्रात उपचाराची सर्व सुविधा व साधने उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा काँग्रेस नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला आहे.