अखेर अमिनाचा शोध लागला

कुटुंबाला बघून अमिना चे अश्रू अनावर

News34 chandrapur

चंद्रपूर – 16 जून ला जुनोना चौक बाबूपेठ येथे राहणाऱ्या 66 वर्षीय अमिना हबीब शेख या क्षुल्लक कारणावरून घरून निघून गेल्या होत्या, त्याबाबत NEWS34 ने वृत्त प्रकाशित केले होते, 2 दिवसांनी अमिना चा शोध लागला असून त्या नातेवाईकांना सुखरूप मिळाल्या.

घरी क्षुल्लक वाद झाला आणि रागाच्या भरात अमिना या घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्या, शेख कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्या कुठे आढळून आल्या नाही, शेवटी कुटुंबाने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

2 दिवस उलटले मात्र त्या कुठेही आढळून आल्या नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली, अखेर 18 जून ला शेख कुटुंबीय व नातेवाईकांचा फोन वाजला, सदर वर्णनाची महिला नागपुरातील पवित्र मोठा ताज बाग येथे असल्याची माहिती समोरून मिळाली.

माहिती मिळताच सकाळी कुटुंब व नातेवाईक नागपूरच्या दिशेने निघाले, मोठा ताजबाग येथे विचारपूस करीत कुटुंब अखेर अमिना जवळ पोहचले, कुटुंबाला बघून अमिनाचे अश्रू अनावर झाले, अमिना अखेर मिळाली त्याचा आनंद कुटुंबाला झाला व ते सुखरूप चंद्रपूरच्या दिशेने निघाले.