देवेंद्र फडणवीसांनी दिले उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला भाजप कार्यकर्ता मेळावा

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली, या मेळाव्यात आर्किटेक्ट ऑफ इंडिया पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

Devendra fadanvis open challenge to uddhav thackeray news34
फडणवीस यांचं ठाकरेंना खुलं आव्हान

त्यांच्या पक्षाला मी परिवारवादी पार्टी म्हटलं तर ठाकरेंना ती बाब खूप झोम्बली, ते माझ्या पत्नीवर बोलायला लागले, उद्धवजी तुम्ही लक्षात ठेवा काचेच्या घरात तुम्ही राहता मी नाही, माझं आयुष्य पूर्णपणे उघडे पुस्तक आहे.
माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्या व परिवाराबाबत तुमच्याकडे काहीही असेल ते स्पष्टपणे बोलून दाखवा, देवेंद्र फडणवीस हा कुणाच्या भानगडीत पडत नाही पडला तर सोडत नाही, ज्यांच्या आलमारीत सांगाडे पडले आहेत त्यांनी सावकारीचा आव आणू नये, सर्व सांगाडे बाहेर काढणार.

 

देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कार्य अद्भुत आहे. असे नेतृत्व भारताला लाभणे हे आपले भाग्य आहे. अश्या महान नेत्यांचे कार्य राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेमक्या शब्दांमध्ये ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे जे व्रत हाती घेतले आहे ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे केले.

Architect of new India bjp book
पुस्तकाचे विमोचन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार लिखित ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, आमदार संदीप धुर्वे,माजी मंत्री डॉ. परिणय फुके, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख,अतुल देशकर,संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, प्रमोद कडु, राजेंद्र गांधी,हरीश शर्मा, संध्या गुरनुले, राखी कंचर्लावार आदी उपस्थित होते.

हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे आणि श्री.रमेश राजुरकर यांनी आज वेगवेगळ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. त्यांचेही मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगातील अनेक देश देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतापुढे झुकत आहेत. आयुष्यमान भारत योजना जगातील सर्वोत्तम मानली जात आहे. एम्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची संख्याही भक्कम झाली आहे असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

मुद्रा योजना, स्टॅन्डअप योजना, स्टार्टअप योजना आदी अनेक योजना देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यशस्वी करून दाखविल्या. ज्या काश्मिरात आधी बॉम्बगोळे फेकले जात होते. त्याच काश्मिरातील लाल चौकात आता तिरंगा शानदारपणे फडकत आहे. देशाच्या विकासासाठी विश्वगौरव, देशगौरव, जननायक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठिशी जनता ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे नमूद करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. या आणीबाणीच्या काळात देशाला खिळखिळे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आता देशाला भयमुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांनी केल्याचेही ते म्हणाले.

 

भारतात लोकशाही समृद्ध होत असल्याचे नमूद करीत ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की भारतीय लोकशाहीच्या आयुधांचा वापर करीत विश्वगौरव, देशगौरव, जननायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे बळ माता महाकाली व भगवान अंचलेश्वर सर्वांना प्रदान करो. काँग्रेस आणि समविचारी पक्ष देशात विषारी विचार पेरण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या विचारांच्या भूलथापांना बळी न पडता प्रत्येकाने राष्ट्रविकासासाठी देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे केले आभारप्रदर्शन भाजपा महामंत्री महानगर रवींद्र गुरुनुले यांनी केले.