News34 chandrapur
चंद्रपूर /राजुरा – मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, उकड्यापासून त्रस्त नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी आलेल्या पावसाने जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले होते, चंद्रपुरात तब्बल महिन्याभरात 4 वेळा पूराने हजेरी लावली होती, मात्र 2 दिवसांच्या पावसामुळे राजुरा तालुक्यातील रस्ता वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा आला तरीही अपूर्ण असल्याने वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी व वाहनांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आला मात्र 2 दिवसाच्या पावसाने रस्ता वाहून गेल्याने परिसरातील गावांचा राजुरा तालुक्याशी सम्पर्क तुटला होता.
तात्पुरता रपटा मंगळवारी नाल्याला आलेल्या पहिल्याच पावसात खचला. यामुळे राजुरा – गोवरी – कवठाळा या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा राजुरा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी तात्पुरता स्वरूपाचा रपटा नाल्यात तयार करून त्यावरून वाहतूक सुरू होती. मात्र दोन दिवसापासून झालेल्या पावसाने आज दिनांक 27 जून, मंगळवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास अचानक रपटा खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गोवरी गावाजवळील नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती.
संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने पावसाळ्यापूर्वी गोवरी येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र पावसाळा सुरू होऊनही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नाल्यातून तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला रपटा नाल्याला आलेल्या पहिल्याच पावसात खचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
राजुरा – कवठाळा हा वेकोली परिसरातून जाणारा मुख्य मार्ग आहे. यामुळे या भागातील नागरिक, विद्यार्थी आणि वेकोलि कर्मचारी यांची मोठी गैरसोय झाली असून त्यांना मोठा फेरा घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय म्हणाले?
राजुरा-गोवरी मार्ग आज सकाळी बंद झाला होता. मात्र माहिती मिळताच तातडीने मशीन लावून मुरुम टाकून पुन्हा रस्ता तयार करण्यात आला आहे. दुपारी पुनःश्च वाहतुक सुरू झाली. या गोवरी जवळील मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र पाणी आल्याने थोडा विलंब असणार असला तरी लवकरच बांधकाम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
– आकाश बाजारे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजुरा.