News34 chandrapur
चंद्रपुर/बुलढाणा – नागपुर वरुण पुण्याला निघालेल्या खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याने त्यामधील 26 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते त्यामधील 7 प्रवासी बाहेर निघाले मात्र 26 प्रवासी बसमध्ये होरपळून गेले.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या बस मध्ये नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते.
ही खाजगी बस विदर्भ ट्रॅव्हल्स ची असून 1 जुलै ला रात्री 2 वाजता सदर बस दुभाजकाला धडकली, बस पलटी झाली, आपत्कालीन दरवाज्याच्या बाजूने बस पलटी झाली, त्यावेळी 7 प्रवासी कसेबसे बाहेर निघाले मात्र 26 प्रवासी बस मध्ये अडकले, काही प्रवाश्यानी बसच्या काचा फोडून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.
अपघातानंतर बस मधील डीझल रस्त्यावर आल्याने बस ने पेट घेतला सदर आग इतकी भीषण होती की प्रवासी संपूर्ण होरपळून निघाले, सध्या प्रशासनाने 25 मृतदेह बाहेर काढले आहे, सध्या कुणाचीही ओळख पटविता येत नाही आहे.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला.
प्रशासनाने जारी केले मदत कक्ष क्रमांक
आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून सदर बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी
जिल्हा नियंत्रण कक्ष (0712-2562668)
अथवा
अंकुश गावंडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8860018817) यांच्यांशी संपर्क साधावा ,असे आवाहन नागपुर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.