News34
चंद्रपूर : राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री करण्यात येत आहे. या तंबाखूजन्य पदार्थामुळे अनेक युवकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कर्करोग सारख्या आजारांनी तरुण ग्रासले जात आहे. अनेक ठिकाणी गांजाची खुलेआम विक्री होत आहे.
यामुळे चंद्रपूर सह राज्यात हजारो युवक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्युमुखी पडले आहे. परंतु सरकार छोट्या वाहनधारकांवर कारवाई करीत आहे. मात्र, मोठ्या कंपन्यांवर व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करणाऱ्यां मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे. त्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी आणण्याची लोकहितकारी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरात सांगितले कि, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी व साठवणुकीसाठी पुनर्वापर न होण्याकरिता सदर वाहन जप्त करण्याबाबत तसेच, सदर जागा किंवा गोदाम सील करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. तसेच गुटखा, पानमसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द करण्याबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सूचित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अवैध गुटखा विक्री रोखण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियम २०११ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
या नियमानुसार कारवाई फक्त लहान व्यापाऱ्यांवर करण्यात येत असून मोठ्या तस्करांना अभय देण्यात येत आहे. येत्या काळात फक्त महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थावर बंदी कागदावर न राहता वास्तविक करण्यासाठी प्रभावी कारवाया कराव्यात. तसेच कायद्यामध्ये देखील अधिक प्रभावी शिक्षा करण्यात यावी याकरिता पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.