समस्या निकाली काढा अन्यथा तीव्र आंदोलन; जवाजी यांचा इशारा!
सिरोंचा; (जिल्हा गडचिरोली)
तालुक्यातील रेगुंठा, कोटापल्ली व परिसरातील दहा ते पंधरा गावात गेली एक आठवड्यापासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नळ योजना ठप्प पडली असून, इतरही सोयीसुविधान कुचकामी झाल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने खंडित वीज पुरवठा व पाणी टंचाई समस्यची गंभीर दखल घेऊन समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे विद्युत पुरवठ्यावर चालणारे नळ योजनांचे मोटरपंप बंद पडले आहेत, त्यामुळे गावात नळाला पिण्याचे पाणी येणे बंद झाले आहे, परिणामी महिला व नागरिकांना भर उन्हात दोन ते तीन किमीचा प्रवास करून सायकल, दुचाकी, बैलबंडी, व स्वतःच्या डोक्यावर भरलेले पाण्याचे पात्र घेऊन पायपीट करून गावाच्या बाहेरील नदीपात्र अथवा शेतातील धोकादायक विहिरीवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यात पाण्यासाठी पायपीट करतांना अनेकांना उंष्माघात व आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊन नागरिक आजारी पडत असल्याचेही जवाजी यांनी म्हटले आहे.
त्यामुळे रेगुंठा, कोटापल्ली व परिसरातील दहा ते पंधरा गावात खंडित असलेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करून पाणी टंचाई व इतर समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश जवाजी यांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे, अन्यथा सिरोंचा तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.