कृत्रिम पाणीटंचाईचा पन्नासहून अधिक कुटुंबांना फटका!
एटापल्ली; (जिल्हा गडविरोली)
तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत ऐकरा (बूज.) गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या हातपंपवर एका खाजगी व्यक्तीकडून मोटरपंप लावून घरगुती कामासाठी पाण्याचा वापर केला जात आहे, त्यामुळे वस्तीतील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून संबंधितांचे मोटरपंप काढून हातपंप सार्वजनिक वापरासाठी खुले करण्याची मागणी सुखदेवी उसेंडी, मुंगली गावडे व महिलांनी गटविकास अधिकारी आदिनाथ अंधारे यांचेकडे केली आहे.
गेली चार महिन्यांपासून ऐकरा (बूज.) गावातील सार्वजनिक हातपंपवर एका खाजगी व्यक्तीने मोटरपंप लावून ताब्यात घेतले आहे, सदरचे मोटरपंप हटवून हातपंप सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यासंबधी स्थानिक महिलांनी अनेकदा ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून मोटरपंप हटविण्याची कोणतीही कारवाही करण्याची तसदी घेतली गेली नाही, त्यामुळे पन्नासहून अधिक कुटुंबांतील महिलांना जीवाची कायली करणाऱ्या भर उन्हात पिण्याचा पाण्यासाठी शेतशिवारातील पडक्या धोकादायक विहिरी व इतरत्र भटकंती करून पाणी भरावे लागत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन सार्वजनिक हातपंपवरील खाजगी मोटरपंप हटवण्याची मागणी सुखदेवी उसेंडी, मुंगली गावडे, बंनी गावडे, संनो गावडे, शारदा गावडे, सरीता दुर्वा, मंजू कुळसामी, जमानी गावडे, देवे गावडे, मीना गावडे, सुनीता दुर्वा, घिसो दोरपेटी, महारी पुंगाटी व महिलांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा पंचायत समिती प्रशासन विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.