सा. बां. विभाग प्रवास्यांचा जीव जाण्याच्या प्रतीक्षेत?
गडचिरोली;
जिल्ह्याच्या एटापल्ली ते आलापल्ली मार्गावर वादळ वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे झुकलेल्या व कोसळलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना त्याठिकानावरून रहदारी करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झाडे हटविण्याची कोणतीही व्यवस्था करतांना दिसून येत नाही, त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून रस्त्यावरची झुकलेली व कोसळून पडलेली अवाढव्य झाडे हटविण्याची मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.
एटापल्ली व अहेरी तालुका घनदाट अरण्याने व्याप्त असून वाहतुक रस्त्याच्या बाजूला अवाढव्य झाडे आहेत, अशातच एक आठवड्यापूर्वी उडेरा ते बुर्गी रस्त्यावर नवलु मासू गावडे नामक चाळीस वर्षीय व्यक्ती चालवीत असलेल्या दुचाकीवर अवाढव्य झाड कोसळून झालेल्या अपघातात नवलू जागीच ठार झाला होता, ही घटना ताजीच असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र धोकादायक झाड कोसळून प्रवाश्यांचा जीव जाण्याची प्रतीक्षा करीत आहेत की काय? असा प्रश्न प्रवासी नागरिकांना पडला आहे. एटापल्ली ते आलापल्ली सत्तावीस किमी रहदारीच्या मार्गात चार पाच ठिकाणी वादळ वाऱ्याने झुकलेली व कोसळून पडलेली झाडे आहेत, त्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनांना धोकादायक मार्गातून प्रवास करावा लागत आहे, आधीच रस्ते खराब व खड्डामय असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, परिसर एक आठवड्यात चार ते पाच अपघात होऊन महिन्याला सात ते आठ प्रवासी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे, त्यामुळे प्रशासनाने एटापल्ली ते आलापल्ली मार्गावर जीवघेणी व धोकादायकरित्या कोसळून पडलेली व झुकलेल्या अवस्थेतील अवाढव्य झाडे हटविण्याची मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.