वीज प्रवाहातील अडथळा दूर, लाखो जीवांचा निवारा, जीवनमानावर प्रभाव!
एटापल्ली;(गडचिरोली)
शहरातील नागरी वस्ती व बाजारपेठेच्या मुख्य मार्गावरील विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण करणारी अनेक अवाढव्य वृक्षांची नगरपंचायत व वीज वितरण कंपनी प्रशासनाकडून बुडापासूनच कत्तल करण्यात आली आहे, त्यामुळे नागरी वस्ती व मुख्य मार्गावरील सुशोभित वृक्षावल्ली नष्ट होऊन लाखो पक्षांचा निवारा, अदृश्य ऑक्सिजनचा पुरवठा नष्ट होऊन शहर ओसाड झाल्याचे दिसून येत आहे.
सहा दिवसांपूर्वी (ता. १जुलै) सोमवारी वनपरिक्षेत्र कार्यालय व नगरपंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मोठा गाजावाजा करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, वृक्षारोपण करून एक आठवड्याचा कालावधी होण्यापूर्वीच शंभर रोपट्यांच्या तुलनेतील एक अशा अनेक वृक्षांची कत्तल नगरपंचायत प्रशासनाने केली आहे, त्यामुळे पर्यावरणवादी व वृक्षप्रेमींच्या भावनांना ठेच पोहचली आहे, वास्तविक विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या कापून अडथळा दूर करणे सोयीस्कर होते, मात्र प्रशासनात व समाजात नियमबाह्य, विघातक व नुकसानदायक कृत्य समर्थकांच्या वाढत्या संख्येने विधायक कृती करण्यापेक्षा विघातक काम करण्यात मौज समजली जाते, वृक्षारोपण करणे हा शासकीय उपक्रम असल्याने प्रशासनाकडून नाक मुरडून कसाबसा राबविला जात असल्याचे बोलल्या जात आहे. वृक्ष कत्तल नियमबाह्य असले तरी ते करतांना अनेकांना मौज वाटते हे या कृतीमुळे लपून राहत नाही,
स्थानिक प्रशासनाने कत्तल केलेल्या वृक्षांमुळे भलेही विद्युत पुरवठ्याचा अडथळा दूर झाला असेल, मात्र लाखो पशु-पक्षकांना निवारा व करोडो जीवांना ऑक्सिजनचा अदृश्य पुरवठ्याने जीवनमान देणाऱ्या निष्पाप वृक्षांना नष्ट व्हावे लागल्याचे दुःख कधीही भरून निघणाने नाही, हे मात्र नक्की!
त्यामुळे अशी वृक्ष कत्तल करतांना भविष्यात पर्यावरण व जीवित सृष्टीवर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी इतकीच अपेक्षा पर्यावरणवादी, वृक्षप्रेमी व नागरिकांकडून केली जाऊ शकते, विघातक कृत्यावर कोणतेही प्रशासन कधी गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाहीची अपेक्षा करणे उचित होणार नाही. सदरच्या वृक्ष कत्तल संबधी वीज वितरण कंपनीचे अभियंता सचिन मडावी यांना संपर्क करून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.