नाल्याच्या पुरात वाहून गेलेला युवक चौदा तासांपासून बेपत्ताच,

शोध मोहीम सुरू,मासेमारीची जाळी लावतांना पुरात पडला,

एटापल्ली;(गडचिरोली)
नगरपंचायत क्षेत्रातील मरपल्ली येथील अक्षय पांडू कुळयेटी, (वय २४) हा युवक गावा शेजारच्या नाल्यावर मासेमारी करण्यासाठी जाळी लावतांना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची माहिती आहे.

अक्षय कुळयेटी हा आपल्या अन्य दोन साथीदारांसोबत (ता.०८ जुलै) सोमवारी रात्री दहा वाजता दरम्यान डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता, त्यावेळी माशांना पकडण्यासाठी नायलॉन जाळी फेकतांना अक्षयचा तोल गेला व तो जलद प्रवाह असलेल्या पाण्यात पडला यावेळी साथीदारांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीचा अंधार असल्याने त्याचा प्रयत्न निष्फळ झाला, आणि क्षणार्धात अक्षय दिसेनासा झाला, सहकाऱ्यांनी लागलीच गावकऱ्यांना माहिती दिली, माहितीवरून रात्री अकरा वाजतापासून गावकरी पुरात वाहून गेलेल्या अक्षयचा शोध घेत आहेत. शोध मोहीम सुरू करून चौदा तासांचा कालावधी होऊनही अक्षय कुळयेटी याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही, पोलीस व महसूल प्रशासनाकडून पुरात वाहून गेलेल्या अक्षय कुळयेटी याचा शोध लावण्यास मदत केली जात असून नागरिकांनी पावसाच्या दरम्यान नदी नाल्यांच्या पुरातून प्रवास करतांना सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासकाने केले आहे