सोळा तासांची शोध मोहीम तीन किमी अंतरावर थांबली,
एटापल्ली;(गडचिरोली)
नगरपंचायत क्षेत्रातील मरपल्ली येथील अक्षय पांडू कुळयेटी, (वय २४) हा युवक (ता.०८ जुलै) सोमवारी रात्री दहा वाजता दरम्यान गावा शेजारच्या नाल्यावर मासेमारी करतांना तोल जाऊन पुराच्या पाण्यातुन वाहून गेला होता, शेवटी सोळा तासांच्या शोधानंतर घटना स्थळापासून तीन किमी अंतरावरील एका बंधाऱ्यात अडकलेल्या अवस्थेत अक्षयचा मृतदेह हस्तगत करण्यात शोधकर्त्यांना यश प्राप्त झाले आहे. अक्षयच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अक्षय कुळयेटी हा आपल्या अन्य दोन साथीदारांसोबत (ता.०८ जुलै) सोमवारी रात्री दहा वाजता दरम्यान डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता, यावेळी माशांना पकडण्यासाठी नायलॉन जाळी फेकतांना अक्षयचा तोल गेला व तो वाहत्या पाण्यात पडून प्रवाहात वाहून जाऊ लागला, साथीदारांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीचा अंधार असल्याने त्यांचा प्रयत्न निष्फळ झाला व क्षणार्धात अक्षय दिसेनासा झाला, त्यामुळे सहकाऱ्यांनी घटनेची माहिती लगेच गावकऱ्यांना देण्यात आली होती,
माहितीवरून त्याच रात्री अकरा वाजतापासून काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार, अर्जुन सिडाम, ईश्वर गावडे, ब्रह्म रापंजी, माधव हलामी, सूरज लेखामी, देवराव लेखामी, संजय वड्डे, कालिदास मितलामी, कोत्तु रापंजी, फकरी रापंजी, नातेवाहिक व गावकऱ्यांनी पुरात वाहून गेलेल्या अक्षयचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोध मोहीमेत शोधकर्त्यांकडून सोळा तासात दहा किमीचे अंतर अक्षरशः पिंजून काढण्यात आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.०९ जुलै) मंगळवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान अक्षय कुळयेटीचा मृतदेह घटना स्थळापासून तीन किमी अनंतरावरील डुम्मे गाव शिवाराच्या एका बंधाऱ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे, घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला जाणार असून घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.