सकाळपासून पाव-पाव, सायंकाळी दीडपाव प्रशासकीय सेवा खल्लास?
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील प्रशासकीय सेवेतील बरेच अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मद्यप्राशन करून कर्तव्य बजावतात, त्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अशावेळी वैतागलेले नागरिक दारुड्या नोकरशहांना उद्देशून ओठावर बारीक मिशी आणि खिशात अत्तरची शिशी! सकाळपासून मोहाच्या दारूचा एक- एक पाव व सायंकाळी दीड पाव पिऊन आपले कर्तव्य खल्लास? अशाप्रकारे संताप व्यक्त करून कार्यालयीन कामे अर्ध्यावर सोडून लाभार्थी आल्या पावली आपल्या गावी परत जातांना दिसून येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील १९८ गावातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, विधवा- निराधार महिला, वयोवृद्ध नागरिक तसेच विविध लाभाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना शासकीय लाभाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तालुका अतिदुर्गम, नक्षल प्रभावी, मागास व आदिवासी बहुल असल्याने याभागात शासकीय सेवेतील बरेच कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी सेवेत रुजू होत नाहीत, ही यामागची खुजी बाजू आहे,
याच गडचिरोली जिल्ह्याची भक्कम बाजू म्हणजे राज्याच्या राजकारणाचे दोन किंगमेकर एक पालकमंत्री राज्याच्या राजकारणाचे चाणक्य उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे पालकत्व स्थानी तर दुसरे राज्य सरकारवर अंकुश ठेवणारे जबाबदार सर्वश्रेष्ठ पदावर विराजमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गृहजिल्हा असे दिपस्तंभित बलाढय कर्तृत्ववान नेतृत्व लाभले असतांनाही शासन स्तरावरून कामचुकार, भ्रष्ट, व्यसनाधीन, निर्लज्ज व कलंकित नोकरशहांना इथे प्रशासकीय सेवेत पाठविले जाते, इतकेच काय तर इतर विभागातील रिक्त पदावरही याच कर्तव्यशून्य प्रशासकीय नोकरशहांना लायकी पेक्षा आणखी दुसऱ्या पदाचा कार्यभार सोपवून पुरस्कृत केले जाण्याची परंपराही कायम आहे, हे विशेष!
त्यामुळे अशा प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गोरगरीब, अशिक्षित, भोळ्याभाबड्या आदिवासी जनतेच्या अज्ञानपणाचा फायदा उचलून आणखीच मुजोरीची वागणूक दिली जात आहे, हे कुठेही लपून राहत नाही. चोवीस तास दारूच्या नशेतले अधिकारी व कर्मचारी खिशात मात्र अत्तरची शिशी बाळगण्याचे विसरत नाहीत, कर्तव्यावर असतांना प्राशन केलेल्या मद्याच्या दुर्गंधीपासून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, खिशातली अत्तरची शिशी काढून आपल्या शरीरावर सुगंधित फवारणी करण्याचे कर्तव्य पार पडले जाते, त्यामुळे अनपेक्षित का होईना या बेवड्यांच्या हातून कार्यालय परिसराच्या वातावरणात सुगंध दरवळण्याचा स्तुत्य उपक्रम मात्र राबविला जातो, हेही नवल वाटू नये थोडके! त्यामुळे आपसूनच अशा व्यसनाधीन अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी बोलतांना ओठावर बारीक मिशी आणि खिशात अत्तरची शिशी, सकाळपासून दर तासाला मोहाच्या दारूचा पावाच्या मागून पाव व सायंकाळी दिडपाव पिऊन प्रशासकीय सेवा खल्लास? अशी कोपरखडी मारण्याशिवाय कोणालाही राहवत नाही, हे मात्र निश्चित!
त्यामुळे मागास, अतिदुर्गम, आदिवासीबहुन भागाच्या नागरिकांची प्रशासकीय कामकाजातील गैरसोय, हेडसांड व त्यातून होणारी पिळवणूक अशा समस्या गांभीर्याने घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या दोन्ही मान्यवरांनी व्यसनाधीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवून शासकीय कामकाजातील दिरंगाईचा अडथळा दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.