टिनपत्र्याच्या धोकादायक डोंग्यातून जीवघेणा प्रवास,

नदी, नाल्यांना पुरामुळे रस्ता विरहित गावे संकटात,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्याच्या दुर्गम भागातील रस्ता विरहित तीस ते चाळीस गावाचा नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जगाशी संपर्क तुटला असून जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी दुथळी भरून वाहणाऱ्या नदी, नाल्यांच्या पाण्यातून टिनपत्र्यापासून तयार केलेल्या धोकादायक डोंग्याच्या साह्याने जीवघेणा प्रवास करण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुरविली जात नसल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

अशातच (ता.१० जुलै) बुधवारी बांडे नदी पलीकडचे कमके, कचलेर व कुकेली गावांतील नागरिकांना जीवनावश्यक साहित्य खरेदी तसेच इतर कामासाठी तालुका मुख्यालय एटापल्ली येथे येण्यासाठी एका टिनपत्र्याच्या धोकादायक डोंग्यातून जीव धोक्यात घालणारा प्रवास करावा लागला आहे. गेली पंधरा वर्षात गडचिरोली जिल्ह्याला वजनदार व वरिष्ठ पातळीवरचे नेतृत्व करणारे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील, राजे अमरीशराव आत्राम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस अशी कर्तृत्ववान पालकमंत्री लाभले आहेत, त्यामुळे शासन दप्तरी कागदोपत्री एटापल्ली तालुक्याचा विकास अतिशय गतिमान झाल्याची नोंद आहे, हे खरेही असावे, प्रत्यक्षात जनसामान्यांचे कल्याण करणारा विकास मात्र झालेला आढळून येत नाही, तर मलाईयुक्त कामांचा विकास झाल्याचे नाकारता येणार नाही, सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याच्या राजकारणातील सर्वश्रेष्ठ नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.

नदी व नाले पुराच्या पाण्याने दुथळी भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांना पाण्याने वेढले असून विद्युत पुरवठा खंडित व पायाभूत सुविधांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत, आजारी रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा, गरोदर मतांच्या वैद्यकीय तपासण्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यची समस्या निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची मदत केली जाण्याची मागणी पूर पीडित नागरिकांकडून केली जात आहे.