पाच पट वीज बिल दरवाढीने ग्राहक हैराण!

वीज वितरणचा भोंगळ कारभार, की शासनाचा डाव?

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील वीज वितरण कंपनीकडून मागील दोन महिन्यांपासून वीज बिलात अव्वाच्या सव्वा चार ते पाच पट रक्कमेची आकारणी केली जात असल्याने, वीज ग्राहक हैराण झाले असून अशा अवाजवी वीज बिल आकारणीत स्थानिक वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार जबाबदार आहे, की राज्य शासनाकडून गोरगरिबांची आर्थिक पिडवणुक करण्याचा डाव? असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे, त्यामुळे अवाजवी वीज बिल आकारणी विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्याची खलबत विविध पक्ष, संघटना व नागरिकांनाकडून केली जात आहे.

जून महिन्याची वीज आकारणीत मीटर ५०४९६०००७९९७ क्रमांकाच्या विज युनिटचे वापर २६८ युनिट वीज बिल २०६० रुपये, याच मीटरची जुलै महिन्यात भरणा करावयाचे १०८ युनिटचे बिल २०२० रुपये आहे, एकाच ग्राहकाने दोन महिन्यात वापरलेल्या वीज युनिटमध्ये तब्बल १६० युनिटची तफावत असतांना, वीज बिलात मात्र केवळ वीस रुपयांचा फरक दिसून येत आहे, यातून वीज वितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे, असेच दुसरे शेजाराचेच मीटरचे ५०४९६०५०७८४१ क्रमांकचे युनिट वापर ४४९ वीज बिल १०,३८० रुपये, व ५०४९६६००९३९८ क्रमांकाच्या मीटरची वीज वापर ९५ युनिट बिल मात्र ११,२०० रुपये, आणखी एका ५०४९६००४१८५१ च्या मिटरचे २५५ युनिट वापरासाठी ३,९३० रुपये आकारणी केली गेली आहे,

सदरचा गलथान व भोंगळ कारभार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून गेली दोन महिन्यांत वीज बिल वाढीने कळस गाठला आहे. ज्या वीज ग्राहकांना त्यांनी वापर केलेल्या युनिटचे मासिक वीज बिल पाचशे ते सहाशे रुपये वाजवी आकारणी केली जात होती, त्याच ग्राहकांना या दोन महिन्यात तितक्याच वीज वापर युनिटसाठी चार ते पाच पटीने दोन हजार ते तीन हजार रुपयांची आकारणी वीज वितरण कंपनीकडून केली आहे, त्यामुळे गोरगरीब, भोळ्याभाबड्या आदिवासी नागरिकांवर आर्थिक भुदंडाचे संकट कोसळले आहे, आगाऊच्या वीज बिलाची रक्कम भरायची कशी आणि कुठून असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे, सदरच्या वाढीव वीज बिल समस्यवर वीज ग्राहकांची कैफियत ऐकून घेण्याचे सौजन्य येथील वीज कंपनी कार्यालयाकडून दाखविले जात नाही, त्यामुळे वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या हेकेखोर वर्तणुकीला शासनाचे पाठबळ आहे की काय अशीही शंका उपस्थित होत आहे, त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या गलथान व भोंगड कारभारामुळे राज्य शासना विरुद्ध आंदोलन उभरण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही, अशावेळी स्थानिक राजकीय पक्ष व संघटनांकडून अवाजवी वीज बिल समस्यावर तीव्र आंदोलन उभारण्यासाठी विचारमंथन करण्यात येत असून वीज ग्राहक नागरिकांच्या सहभागाने तीव्र आंदोलन उभारले जाण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वरील अवाजवी विज बिल समस्यांवर वीज वितरण कंपनीचे अभियंता सचिन मडावी यांनी प्रतिक्रिया देतांना ज्या वीज ग्राहकांचे वीज बिल अवाजवी किंवा वीज वापरापेक्षा जास्त आले आहे. त्या ग्राहकांच्या वीज वापराची तफावत तपासून बिलाची रक्कम कमी करून देण्यात येईल, असे त्यांनी “जनकत्व” न्युजशी बोलतांना सांगितले आहे.