हिवतापग्रस्त लेकीच्या उपचारासाठी बापाचा जीवघेणा प्रवास,

नाल्याच्या प्रवाहातून पायी चालून गाठले प्राथमिक आरोग्य केंद्र,

भामरागड; (गडचिरोली)
तालुक्यातील रस्ता विरहित बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी (वय ०३ वर्ष) या चिमुकलीच्या बिघडलेल्या तब्बेतीवर उपचार करण्यासाठी तिला खांद्यावर घेऊन सहा किमीचे अंतर व त्याच वाटेतील पावसाच्या पाण्याने दुथळी भरून वाहणाऱ्या दोन नाल्यांमधून जीवघेणा प्रवास वडील पांडू जेट्टी यांना करावा लागल्याची हृदय हेलवणारी घटना घडली आहे, त्यांनी आजारी मुलीला लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले असून पांडू जेट्टी यांचे धाडस व कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

रवीना पांडू जेट्टी ही चिमुकली (ता.१३ जुलै) शनिवारी सकाळी दरम्यान तापाने फणफनात होती, तिच्यावर उपचार करण्यास गावात कोणतीही वैद्यकीय सेवा उपलब्द नसल्यामुळे तिचे वडिल पांडू जेट्टी यांनी मुलीच्या आरोग्यासाठी जीवघेणा प्रवास करून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला हिवतापाची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यामुळे तिला भरती ठेऊन वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकतेचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता, मात्र, भरती राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी यांची तयारी नसल्याने ते जबरीने चिमुकलीला घेऊन दवाखान्यातून गावी परत निघून गेले होता. ही बाब वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी भोकरे यांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांच्या लक्ष्यात आणून दिली, त्यामुळे रविनाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन बोगामी यांनी संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांना सोबत घेऊन लाहेरीवरून ६ किलोमीटर अंतरावरील बंगाडी गाव गाठले, यावेळी बोगामी यांनी पांडू जेट्टी यांची समजूत काढून आजारी रविनाला परत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी राजी केले. त्यानंतर मुलीच्या वडिल पांडू यांनी रविना हिला घेऊन दुथळी भरून वाहणाऱ्या दोन नाल्यांच्या पाण्यातून (१३ जुलै) शनिवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान परत उपचारार्थ दाखल करण्यासाठी घेऊन आले आहेत. रविना हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली.

रस्ता विरहित लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रात चाळीस गावांचा समावेश आहे. लाहेरी ते बंगाडी गाव दरम्यान दोन अवाढव्य नाले पावसाच्या पाण्याने दुथळी भरून वाहतात, या दोन्ही नाल्यांवर दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजुरी देऊन पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र बांधकाम पूर्ण झालेले नाही, यातील बंगाडी नाल्यावरील बेलीब्रिजचे कामही रखडलेले आहे. त्यामुळे नाल्यांच्या पलीकडील दहा ते पंधरा गावांच्या नागरिकांना लाहेरी तसेच तालुका मुख्यालय भामरागड गाठण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या उपयोजना करून नागरिकांच्या मूलभूत गरजा व आरोग्य समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली जात आहे.