तर राजकारणी तुमच्या मरणावर टपली आहेत?

समस्या निवारण नाही, तेराव्यात हातावर तुरीपेक्षा जळ, पाकीटावर भर!

गडचिरोली;
राजकारणाची कूस बदलली आहे, पूर्वी नागरिकांचे आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, अन्न, वस्त्र, निवाराचे ब्रीद खांद्यावर घेऊन सोयीसुविधा निर्माणीचा आराखडा तयार केला जात होता, यातून दीर्घकालीन विकासाचा संकल्प राजकीय पक्ष, संघटना पुढाऱ्यांकडून केला जात होता, मात्र खिरापतीच्या राजकारणात गोरगरीब जनतेच्या मरणात आणि त्याच्या तेराव्याचे जेवणात नातलगांसोबत सांत्वना फोटो काढण्याची नवी संकल्पना उदयास आली आहे. त्यामुळे राजकारणी तुमच्या मरणावर टपली आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.

भामरागड तालुक्यातील बंगाडी गावाच्या रविना पांडू जेट्टी या हिवतापग्रस्त तीन वर्षीय चिमुकलीला उपचार घेण्यास सहा किमीची वाट मिळत नाही, तिचा जिगरबाज बाप जीव धोक्यात घालून दुथळी भरून वाहणाऱ्या दोन नाल्यांच्या पुराच्या पाण्यातून पायी चालत प्रवासाने लेकीचा प्राण वाचवतो, एटापल्लीतील तोडसाचा शिवाजी वेळदा व जवेली गावाचा उलगे तिम्मा या अपघातग्रस्तांवर वेळीच उपचार मिळणे दुरापास्त झाले होते, तसेच मरपल्ली नाल्यात वाहून मृत्यू पावलेला अक्षय कुळयेटी व त्याच नाल्यात बुडून मेलेला अमित तिम्मा यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणीत वैद्यकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा व दिरंगाई लपून राहत नाही, अहेरी व सिरोंचा या दोन तालुक्यांना जोडणारा महामार्ग तीन वर्षांपासून प्रवाशी नागरिकांना सापडलेला नाही. त्यामुळे सिरोंचा तालुका महाराष्ट्र राज्याच्या बाहेर अलगत फेकल्या गेल्याच्या अवस्थाच कोणालाही वावडं दिसत नाही. ढिसार कारभाराची जबाबदारी कोणाची घेईल असेही इथे दिसत नाही, कामचुकार लोकं मेल्याच सोंग आणि राजकारणी दुःखात सामील झाल्याचे ढोंग करतो! पुढारी मयताच्या बायकोच्या हातावर तुरीपेक्षा जळ पैशाच पाकीट ठेऊन दान करतो, आणि मयताच्या दारात उभे होऊन, फोटो काढतांना गालात गोळ हास्य फुलवून परिवाराचं सांत्वन करतो.

त्यामुळे असंवेदनशील पुढाऱ्यांला जनसामान्यांची अधोगती व समस्यांकडे लक्ष देण्याच वावडं असल्याचं निदर्शन नोंदविण्यात जनता मुळीच विसरत नाही. शिक्षणाचा बट्याबोल, विद्यार्थ्यांना वर्गात दर्जेदार शिकवणी देण्यापेक्षा बुट्ट्या मारण्यात गुरुजींना शाब्बासकी वाटते! आरोग्याची ऐसीतैशी, उपचार करण्यापेक्षा निवासस्थानी पायाच्या दोन्ही टांगा वर उचलून आराम करण्यात डॉक्टरांना हुशारकी वाटते! प्रशासकीय अधिकाऱ्याला पगारापेक्षा कमिशन व हप्ता वसुलीच्या कार्यात दंड थोपटून घेण्यात मौज वाटते. कर्मचाऱ्यांना गोरगरीब लाभार्थ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवण्यात खुशी लाभते, विवाहित पुरुष दारू ढोसून तर युवावर्ग खर्रा चघळून ज्ञानप्राप्तीची अदभूती साधते! आणि म्हणूनच आजचे राजकारणी जन समस्या निवारणावर पाणी सोडून तुमच्या मरणाच्या तेराव्याचं भोजन खाण्यात सहानभूती लाटले!

इतका अनर्थ कोणी व कसा केला, तर पुढाऱ्याने खुर्चीसाठी कॉफी करून, विद्यार्थ्याची रोजगारासाठी पेपर फुटी करून व जनतेने लाचार होऊन स्वाभिमानी नीती छाटून! अशा प्रकारे सर्व घटकांनी आपआपल्या जीवनाची माती केली आहे, त्यामुळे राजकारणी तुमच्या मरणावर टपली असून समस्यांचे निवारण करण्याचे सोडून तेराव्याच्या जेवणावर ताव मारण्यात मशगुल आहेत? अशी विदारक राजकीय स्थिती गंभीर चिंतनाचा विषय असून राजकारणात सुधारणा होण्यासाठी जनतेत जागृती निर्माण होण्याची अपेक्षा सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.