आणखी एक नक्षल्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण,

माओच्या क्रांतीचे शस्त्र आता शांततेच्या उत्क्रांती मार्गावर!

भामरागड;(गडचिरोली)
तालुका दलम सदस्य लच्चू कटीया ताडो (वय ४५) या शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर असलेल्या नक्षल्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे माओच्या विचाराच्या क्रांतीचे शस्त्र आता शांततेच्या उत्क्रांती मार्गावर उभे होतांना दिसून येत आहेत.

भामरागड तालुक्यातील भटपार येथील लच्चू ताडो हा सामान्य कुटुंबातील नागरिक माओच्या विचारधारेच्या क्रांतीवर प्रभावित होऊन २०१२ मध्ये गावातच राहून नक्षल समर्थीत जनमिलिशिया म्हणून नक्षल चळवळीला आवश्यक साहित्य, अन्नधान्याचा पुरवठा करणे, त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे, पोलिसांची गुप्त माहिती नक्षल्यांना पुरवणे, अशाप्रकारची कामे करून नक्षल चळवळीला मदत करीत होता. त्याच्या कामगिरीवर प्रभावित होऊन नक्षल्यांनी गेल्या वर्षभरापूर्वी त्याची भामरागड दलम सदस्य म्हणून नेमणूक केली होती, दरम्यानच्या कालखंडात त्याने केलेल्या हिंसक कारवायांमुळे त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये इरपनार गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांनी १९ वाहनांची जाळपोळ केली होती, त्यात लच्चूचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २०२३ मध्ये नेलगुंडा गावाजवळच्या जंगलात स्फोटके पुरुन ठेवण्यातही तो सहभागी असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

राज्य शासनाची आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७० नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तसेच २०२२ ते २०२४ या कालावधीत २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून सामान्य जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषद दरम्यान दिली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या सक्षम उपाययोजनांच्या प्रभावाने माओच्या विचार क्रांतीची शस्त्रे चालवणारी हात आता शांततेच्या मार्गाने सामान्य जीवन जगण्याची उत्क्रांती करण्याच्या दिशेने आगेकूच करतांना दिसून येत आहेत,