सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, निकृष्ट दर्जाच्या बांधकाम चौकशीची मागणी,
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील अतिवृष्टीच्या पावसाने जवेली येथील आदिवासी सांस्कृतिक गोटूल भवन कोसळून जमीनदोस्त झाले आहे, सुदैवाने आतमध्ये अथवा बाहेरच्या बाजूला कोणाही नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. सरपंच कैलास उसेंडी व गावकऱ्यांनी निकृष्ट बांधकामाच्या चौकशीची मागणी केली आहे.
शासनाने दहा वर्षापूर्वी जवेली या गावात आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक गोटूल भवनाचे स्लॅब छताचे पक्के बांधकाम केले होते, या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व बैठकी घेण्यात येत होत्या, (ता. २५ जुलै) सायंकाळी चार वाजता दरम्यान सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसात गोटूल भावनची इमारत स्लॅबसह अचानक कोसळून जमीनदोस्त झाली, यावेळी सदरच्या गोटूल भवनाच्या आत अथवा बाजूला कोणीही हजर नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही. आदिवासी समाजाच्या भोलेभाबळेपणाचा फायदा घेऊन अनेक विकास कामाची बांधकामे कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे केली जातात, त्यामुळे अशी बांधकामे अल्पावधीतच कोसळून जमीनदोस्त होत आहेत,
त्यामुळे गोटूल भवनाचे झालेले निकृष्ट दर्जाच्या बांधकामांची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची मागणी केली जात असून, अतिवृष्टीने कोसळलेले गोटूल भवनाचे बांधकाम पुनश्च करण्याची मागणी सरपंच कैलास उसेंडी व नागरिकांनी केली आहे