पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांशी तरुण तगड्याची टक्कर होणार?
अहेरी;(गडचिरोली)
विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पारंपरिक रित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या वाट्याचा आहे. आगामी निवडणुकीच्या आखाड्यात या गटाने चांगलीच कंबर कसली असून पक्ष सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या वीस आमदारांच्या विरुद्ध नवीन व तरुण चेहऱ्याला संधी देऊन मैदानात उतरविण्याचे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध तरुण व तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दिला जाण्याची चाचपणी केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अभेद्य बालेकिल्ला मनाला जातो, अशावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावकौकीक असणारे उच्च शिक्षित व ख्यातीप्राप्त युवकांचा शोध राष्ट्रवादी काँग्रेस कडून घेतला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी प्रबळ दावेदारी मांडण्यासाठी तीन ते चार ख्यातनाम युवकांनी मुंबई तसेच बारामतीची वारी करून उमेदवारीवर दावे सादर करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या नव्या युवा व तडपदार चेहऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अहेरी विधानसभेसाठी संधी दिली जाते याकडेही मतदाराचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेल्या आमदारांमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी विधानसभा क्षेत्रासह, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, बारामती, पलटण, पुसद, अंबळनेर, उदगीर, मावळ, इंदापूर, परळी, अणुशक्ती नगर, कागल, आंबेगाव, तुमसर व वडगांव शरीफ अशा मतदार संघांतील आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून कोणत्या ख्यातनाम तरुणांची उमेदवारी निश्चित केली जाते याविषयी राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहेत.