नक्षल चळवळीचा विभागीय प्रवक्ता श्रीनिवास याचा प्रसिद्धी पत्रकातून गंभीर आरोप!
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्याच्या जारावंडी पोलीस स्टेशन हद्दीतील वांडोली गाव जंगल परिसरात तीन आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकी नंतर (ता.१० ऑगस्ट) शनिवारी नक्षली चळवळीचा पश्चिम विभागीय प्रवक्ता श्रीनिवास याने एक प्रसिद्धी पत्रक काढून चकमकीत ठार झालेल्या सहकारी नक्षलवाद्यांच्या नाम उल्लेखाने चकमकीवर प्रश्नचिन्ह लावून राज्य शासन लोहखनिजांची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. सदरच्या चकमकीत तीन प्रमुख नक्षल्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड व चातगाव अशा चार दलमलचे १२ नक्षलवादी ठार झाले होते. त्यामुळे चकमकीनंतर उत्तर गडचिरोली भागातील नक्षल चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
नक्षल्यांनी जाहीर केलेल्या पत्रकातून राज्यात सत्तेवर असलेल्या शासनकर्त्यांची गडचिरोली जिल्ह्यातील मौल्यवान लोहखनिजांवर नजर असून लोहखडणी देशातील धनदांडग्यांना कवडीमोल किंमतीत दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकात केला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आले होते. नेमकी त्याच दिवशी संधी साधून पोलिसांकडून चकमक घडवून आणली होती, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. चकमकीत ठार झालेल्या १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येऊन त्यांच्यावर सन्मानजनक अंतिमसंस्कार करण्याची मागणी प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकातून केले आहे. आधीच माघारलेल्या नक्षल चळवळीला वांडोली जंगलातील चकमकीत ठार झालेल्या बारा सहकाऱ्यांचा मुद्दा चांगला जिव्हारी लागला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात मजकुरावरून दिसून येत आहे.
सदरच्या पत्रकावर प्रतिक्रिया नोंदवितांना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी
वांडोली चकमकीनंतर मृत नक्षलींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नऊ नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाहिकांना अंत्यविधीसाठी सुपूर्द केले आहेत. उर्वरित तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगड राज्यातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांचे नातेवाहिकांकडून प्रतिसाद मिळताच उर्वरित तिघांचे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सततच्या घटनांमधून नक्षल्यांची चौफेर कोंडी झाली आहे. तसेच शिक्षित व सुजाण नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने नक्षलवादी निराश व हताश झाले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हताश न होता पुढील जीवनाचे भवितव्य उज्वल करण्यासाठी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी सोडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.