नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे,

मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील नऊ नगरपंचायत नगराध्यक्षांना होणार फायदा.

गडचिरोली;
राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुन्हा कारभार करण्याची संधी मिळाली आहे.

अडीच वर्षांपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या एटापल्ली, भामरागड, कोरची, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व चामोर्शी, अशा नऊ नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची मुदत १३ व १४ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यामुळे अध्यक्षाचे अधिकार व कर्त्यव्य पार पाडण्यासाठी त्या-त्या ठिकाणच्या तहसीलदारांच्या नावे (ता.१२ ऑगस्ट) सोमवारी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आदेश काढून प्रशासकांची नेमणूक केली होती. मात्र एकाच दिवसात (ता. १३ ऑगस्ट) मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवून अडीच वर्षाच्या मुदती संपलेल्या राज्यातील संपूर्ण नगरपंचायती, नगर परिषद व नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी पाच वर्ष केल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अडीच वर्षाची मुदत संपून नवीन आरक्षणात संधी मिळण्याच्या आशेवर असलेल्या अनेक नगरसेवकांचे स्वप्ने भंगली असून पदे जाण्याने हिरमुसून असलेल्या नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुन्हा पदांची बहालीमुळे त्यांच्यातला आनंद गगनात मावेनाशी झाल्याचे दिसून येत आहे.