कोईनवर्षीच्या गोटूल भवन आवारातील घटना, नागरिकांमध्ये दहशत.
एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील गर्देवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीच्या कोईनवर्षी गावात असलेल्या, सांस्कृतिक गोटूल भवन आवारात नक्षल्यांनी काळे झेंडे फडकवून स्वातंत्र्य दिनाचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे गाव परिसरात नक्षल्यांची दहशत पसरली आहे.
देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना अतिदुर्गम व छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील कोईनवर्षी गावात (ता.१५ ऑगस्ट) गुरुवारी सकाळी दरम्यान काही शस्त्रधारी नक्षली दाखल झाले, त्यांनी गावातील गोटूल भवन समोरील खुल्या जागेवर एकत्र होऊन देश विरोधी नारेबाजी केली, यावेळी नक्षल्यांचे विघातक कृत्य पाहून नागरिक भयभीत झाले होते, नक्षल्यांनी काही बांबूच्या काठ्यांवर काळ्या रंगाचे कापड गुंडाळून ठेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आहे. यावेळी गावात तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करू नये अशी धमकी नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळातच सर्व नक्षली गावाच्या बाहेर जंगलाच्या दिशेने निघून गेले, गावकऱ्यांकडून घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
नागरिकांच्या माहितीवरून गर्देवाडा पोलिसांनी काळ्या रंगाचे कपडे जप्त करून घटनेची चौकशी सुरू केली आहे. परिसरात पोलिसांचे नक्षल विरोधी शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे. (जनकत्व न्युज नेटवर्क)