सांगली पालिका आयुक्त गुप्तांच्या अवगुणांचा पीडित आदिवासींनी वाचला पाढा,

आयएएस काढा, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी!

गडचिरोली;
जिल्ह्यातील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, भामरागडचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रशिक्षणार्थी आयएएस शुभम गुप्ता यांनी बनावट नोटीस बजावून कंत्राटदारांकडून खंडणी वसुली केली, तर अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांवर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने खोटे गुन्हे नोंदवून तुरुंगात डांबले, असा धक्कादायक आरोप आदिवासींसह मानवाधिकार संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. त्यामुळे शुभम गुप्ता यांच्या वादग्रस्त कार्यकाळाची उच्च स्तरीय चौकशी करून त्यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून आयएएस पदवी काढून घेण्याची मागणी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्फत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

कथित गाय वाटप घोटाळ्यात दोषी आढळल्याने चर्चेत असलेले आयएएस शुभम गुप्ता सध्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत आयुक्त पदावर आहेत. गाय वाटपानंतर वराह (डुक्कर)पालन योजनेतही त्यांच्यावर लाभार्थ्यांनी घोटाळ्याचाआरोप केले आहे. (ता. २३ ऑगस्ट) शुक्रवारी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात एटापल्ली व भामरागड या दोन्ही तालुक्यातील पीडित आदिवासी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून आयएएस शुभम गुप्ता हटाव, महाराष्ट्र बचाव… शुभम गुप्तांवर अशी घोषणाबाजी करून, शुभम गुप्तांच्या यानंतर पत्रकार परिषदेत गुप्तांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारनाम्यांचा पाढाच यावेळी पीडितांना वाचून दाखविला आहे.

भामरागड येथील भारती इष्टाम यांना मिळालेला वनपट्टा गुप्ता यांनी नोटीस देऊन कुठलेही म्हणणे मांडण्याची संधी न देता त्यांच्या सासऱ्यांच्या नावाची शेतजमीन परत शासनाकडे जमा केल्याची कारवाही केली असे सांगितले. याविरोधात त्यांनी गुप्तांकडे दाद मागितली असता अवमानजनक वागणूक देणून लज्जास्पद शब्द वापरले असल्याचेही सांगितले आहे. सदर प्रकरणात इष्टाम यांना न्यायालयीन लढ्यातून न्याय मिळाला आहे.

एटापल्लीचे कंत्राटदार विनोद चव्हाण याना बनावट नोटीस बजावून गुप्ता यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पैसे न दिल्याने शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा नोंदवून कारागृहात डांबल्याचे म्हटले. शिवाय लॉयड मेटल्स कंपनीकडे केलेल्या कामाचे पैसे कंपनी प्रशासनावर दबावात टाकून गुप्ता यांनी स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले, असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.

यावेळी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, आदिवासी प्रश्नांवर काम करणाऱ्या मिस इंडिया मनीषा मडावी यांनी पूजा खेडकरप्रमाणेच शुभम गुप्तांचे आयएएस रद्द करून त्यांचेवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदण्याची मागणी केली आहे. भामरागड तालुका हा नक्षल प्रभावी, अतिमागास, दुर्गम आदिवासी बहुल असून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्यपालांनी दत्तक घेतलेला आहे, मात्र येथे गुप्तांसारख्या अवगुणी अधिकाऱ्यांकडून गोरगरीब व अशिक्षित आदिवासींवर इंग्रजापेक्षाही भयंकर अत्याचार केल्या गेल्याचा आरोप मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, नगरसेवक, मनीषा मडावी व उपस्थित मान्यवरांनी केला आहे. यावेळी शुभम गुप्ता यांचे विरुद्ध कठोर कारवाही न झाल्यास महाराष्टाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पत्रकार परिषद वेळी मानवाधिकार प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे, नगरसेवक मनोहर बोरकर, शंकर ढोलगे, जावेद अली, कृष्णा वाघडे, सूरज हजारे, पार्थ खुणे, राहुल झोडे, गौतम अधिकारी, केसरी मटामि, यशोदा पुंगाटी, भीमराव वनकर व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदरच्या आरोपांवर माध्यमांनी सांगली पालिका आयुक्त शुभम गुप्ता, यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. सर्व प्रकरणात तेव्हा नियमानुसारच कारवाया केलेल्या आहेत. त्याचे पुरावेदेखील आहेत. त्यामुळे या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.