जादूटोण्याचा संशयातून वृद्ध महिलेची हत्या, वृद्ध पती बेपत्ता.

एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावाच्या शेत शिवारातील घटना,

एटापल्ली;(गडचिरोली) तालुक्यातील करपनफुंडी येथील वृद्ध महिला बुर्गो रैनु गोटा (वय ५५) हिची जादूटोण्याच्या संशयावरून हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या नदीत फेकून देण्यात आला असून तिचा पती रैनु जंगली गोटा (वय ६०) हा बेपत्ता आहे, त्याचीही हत्या झाली असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. सदरची घटना (ता. २७) मंगळवारी उघडकीस आली.

रैनू गोटा व त्याची पत्नी बुर्गो गोटा हे करपनफुंडी गावापासून ५ किमी दूर असलेल्या जांबिया नाला व बांडे नदीच्या संगम शेजारच्या स्वमालकीच्या शेतातील झोपडीत वास्तव्याने राहत होते.

गेल्या (ता. २४ ऑगस्ट) शनिवारपासून ते दोघेही शेतातील झोपडीतून बेपत्ता होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयांकडून दोघांचाही शोध घेतला जात होता. (ता.२७ ऑगस्ट) मंगळवारी सकाळी दहा वाजता दरम्यान जांबिया नाला व बांडे नदीच्या संगमावर कोणाचा तरी मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून जवळ जाऊन पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत वृद्ध महिला बुर्गो गोटा यांचा मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली आहे.

सदरची घटना संशयास्पद असून मृत बोर्गो गोटा व बेपत्ता रैनु गोटा यांची जादूटोण्याच्या संशयातून हत्या झाल्याचा संशय नातेवाहिकांना व्यक्त केला असून घटनेचा पुढील तपास बुर्गी पोलिसांकडून करण्यात येत आहे.