सुरजागड प्रकल्पाची खैरात परप्रांतीयांना, स्थानिकांची मात्र बोळवण!

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव यांचा भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातून गंभीर आरोप!

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या कामात स्थानिकांमधून ऐंशी टक्के बेरोजगारांना सन्मापूर्वक रोजगार मिळण्याच्या अटीवर मी मंत्री असतांना करार केला होता. मात्र लॉयल्ड मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या प्रशासनाकडून परप्रांतीय नोकरदारांना दुप्पट पगार व सर्व सोयीसुविधा पुरविल्या जात असतांना स्थानिक कामगारांना मात्र अर्धा पगार व कोणत्याही सोयी उपलब्द केल्या जात नसल्याचा गंभीर मुद्दा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी कार्यकर्ता मेळाव्यातून उपस्थित केला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या, माझेकडून स्थानिकांवरील अन्याय दूर केला जाईल, असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी कंबर कसली असून, युती धर्माला तिलांजली देत, महायुती सरकार मधील अन्न व औषधी प्रशासन विभागाचे जेष्ठ मंत्री व अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांचे विरुद्ध रणसिंग फुंकून आहे. गेली काही दिवसांपासून राजे अम्ब्रिशराव यांच्याकडून अहेरी विधानसभा क्षेत्रातील, एटापल्ली, अहेरी, मुलचरा, सिरोंचा व भामरागड अशा पाचही तालुक्यात झंझावाती दौरे सुरू करून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीच्या युती धर्मात उभे फूट पडल्याची बाब जनतेपासून लपून राहत नाही. (ता.०१ सप्टेंबर) रविवारी एटापल्ली येथील आदिवासी सांस्कृतिक भवन गोटूल येथे एटापल्ली तालुका भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना गेली पाच वर्षापासून कंपनी प्रशासनाकडून रोजगारासाठी स्थानकांवर सतत अन्याय केला जात आहे. मात्र स्थानिक आमदार तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे या समस्येकडे कोणतेही लक्ष देतांना दिसून येत नाहीत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशा निष्क्रिय आमदारांना घरचा रस्ता दाखविण्याची गरज असल्याचेही मत राजे अम्ब्रिशराव यांनी व्यक्त केले आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दारुण पराभव केला होता, हे दोघेही दिग्गज राजकारणी असून ते अहेरी राजघराण्याचा वारसा चालवत आहेत, नात्याने मंत्री धर्मरावबाबा व राजे अम्ब्रिशराव चुलते पुतणे आहेत. हे विशेष!

पुढे बोलतांना सुरजागड प्रकल्पात जास्तीत जास्त परप्रांतीय युवकांना रोजगार देऊन स्थानिक युवकांना डावलले जात असल्याचेही अम्ब्रिशराव यांनी म्हटले आहे. यातून परप्रांतीयांना खैरात वाटली जात असून स्थानिकांची बोळवण केले जात असल्याचेही निदर्शन अम्ब्रिशराव यांनी नोंदविले आहे. तसेच स्थानिक नोकरदारांना तटपुंज्या पगारच नाही तर चौकीदार व सुरक्षरक्षकांसारख्या कमकुवत दर्जाच्या कामावर ठेऊन अपमानीत केले जात आहे. अशावेळी पाच वर्षांपासून विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मी निवडून आल्यावर हे सर्व चित्र बदलवून परप्रांतीयांना प्रकल्पाच्या बाहेर करून स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्यक्रमाने सुरजागड प्रकल्पाच्या नोकरीत सामावून घेण्याची सक्ती केला जाईल, अन्यथा सुरजागड प्रकल्पाचे लोहखनिज उत्खनन करणाऱ्या लोयल्ड मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागेल, यापुढे सुरजागड लोहखनिज पहाडीवरील एक दगडीही उत्खनन करू दिला जाणार नाही, असा गर्भीत इशारा राजे अम्ब्रीशराव यांनी दिला आहे.

कार्यकर्ता मेळावा प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत आत्राम, भाजप तालुका महामंत्री मोहन नामेवार, अशोक पुल्लुरवार, नगरसेवक दिपक सोनटक्के, नगरसेवक राहुल कुळमेथे, सरपंच वनिता कोरामी, सुनिता चांदेकर, विजयालक्ष्मी जंबोजवार, बाबला मजुमदार, सम्मा जेठ्ठी, सागर मंडल, दिपक पांडे, अनिकेत मामीडवार, मनिष ढाली, आशिष बक्षी, सुधीर तलांडे, तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्ये व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,