ताडगाव पोलीस व आसरा फाउंडेशनच्या मदतीने पाण्यातून काढले सुरक्षित बाहेर,
भामरागड;(गडचिरोली)
तालुक्यातील ताडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वटेली नाल्याच्या पुरातून वाहून गेलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नितीन विजयकुमार काळे (वय ३०) तोडसा व बँक मित्र तिरुपती शंकर चापले (वय ३०), रा. पंदेवाही ता. एटापल्ली यांना ताडगाव पोलीसांनी आसरा फाउंडेशनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले आहे.
परतीच्या पावसाने (ता. ०८ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता दरम्यान दमदार हजेरी लावल्यामुळे एक ते दोन तासातच नदी व नाले दुथळी पुराच्या पाण्याने भरून वाहत आहेत. अशातच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नितीन काळे व बँक मित्र तिरुपती चापले हे एक दुचाकीवरून तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ ऋषभ राव (वय २५) व नेत्रतज्ञ ताकसेन अंबिकर (वय २६) हे दोघे दुसऱ्या दुचाकीने (ता. ०८ सप्टेंबर) रविवारी रात्री आठ वाजता दरम्यान ताडगाव वरून एटापल्लीकडे मागेपुढे येत होते, यावेळी वटेली गावा शेजारच्या नाल्याच्या पुलावरील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून दुचाकीसह काळे व चापले दोघेही वाहून जाऊन एका झाल्याच्या फांदीला अडकले, डॉ ऋषभ राव व ताकसेन अंबिकर यांनी दुचाकी मागेच थांबवून पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ नितीन काळे व तिरुपती चापले हे दोघे दुचाकीसह प्रवाहित पाण्यातून काही अनंतरावर वाहून गेले, त्यावेळी त्या दोघांनाही एक झाडाच्या फांदीचा सहारा मिळाल्याने त्या फांदीचा आसरा घेऊन ते पुराच्या पाण्यातुन बाहेर येऊन झाडाच्या बुंध्यावर अडकून पडले होते, सदरची बाब ताकसेन अंबिकर यांनी ताडगाव पोलीस स्टेशनला जाऊन प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत डगवार यांना सांगितली, मिळालेल्या माहितीवरून प्रभारी अधिकारी प्रशांत डगवार, पोलीस उपनिरीक्षक रंजित मस्के, संगम गायकवाड, सलमान खान पठाण, यांनी आसरा फाउंडेशनचे शंकर हलदार, प्रकाश आत्राम, सुनील मडावी, मनोज महालदार, किंकर मिरदा व सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले, यावेळी झाडाला दोर बांधून पुराच्या प्रवाहात अडकलेल्या डॉ नितीन काळे व तिरुपती चापले यांना दोरीच्या साह्याने पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. त्या दोघांनाही तत्परतेने पाण्यातून बाहेर काढल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला कोणतीही इजा झालेली नाही.
सदरच्या घटनेची माहिती तहसीलदार हेमंत गांगुर्गे यांना मिळाल्यावरून तेही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर गव्हाणे, तलाठी पंकज उसेंडी, प्रवीण मडावी, निलेश गावडे, प्रवीण आत्राम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पुरात वाहून गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाहणी केली होती, ताडगाव पोलीस व आसरा फाउंडेशनच्या तत्परतेने पुरात वाहून गेलेल्या डॉ नितीन काळे व तिरुपती चापले यांचे प्राण वाचल्याने आसरा फाऊंडेशन व पोलिसांचे सर्वत्र आभार मानले जात आहे.