स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर लालपरी पोहचली गर्देवाडा गावात!

नक्षली गडातील नागरिकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठीची मोठी उपलब्धी?

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील अतिदुर्गम, मागास व नक्षली हालचालींचे केंद्र मानल्या जाणाऱ्या गर्देवाड्यात नऊ महिने पूर्वी शासनाने पोलीस मदत केंद्राची उभारली केली आहे. त्यानंतर आता गावात बससेवा सुरू करून नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन स्तरावरून केला जाण्याची ही एक मोठी उपलब्धी मनाली जात आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या भागातील नागरिकांनी गावात एसटी बस पाहिली नव्हती. मात्र काही महिन्यांपूर्वी ताडगुडा नाल्यावरील पुलाचे व गट्टा ते तोडगट्टा गावापर्यंतचे रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून झाल्यामुळे (ता. २२ सप्टेंबर) रविवारी या गावात पहिल्यांच एसटी बस पोहोचवण्यात शासन, प्रशासनाला यश आले आहे. गर्देवाडा ते अहेरी अशी बसफेरी आता सुरू करण्यात आली आहे. नक्षल प्रभावित गर्देवाडात १५ जानेवारी २०२४ ला शासनाने नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे. पोलीस मदत केंद्र स्थापनेपासून परिसरातील नागरिकांना पोलीस विभागाच्या वतीने विविध शासकीय लाभाच्या योजना, सोयी, सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एस टी बसचा शुभारंभ करतांना गावातील महिलांच्या हस्ते पुजन करुन बससेवा सुरु करण्यात आली आहे. यावेळी एसटीचे चालक रामू कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बसचे वाहक गणेश गोपतवार यांनी नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर संबधी विस्तृत माहिती दिली आहे. बस सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी, बँकेची व ईतर शासकिय कामे विनाविलंब करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे व महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे.

बससेवा शुभारंभ पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून, सीआरपीएफचे असिस्टंट कमाण्डंट संतोष डरांगे, पोलीस निरीक्षक जितेंद्र, पोमकें गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी धनाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम अहिरे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक देवकुळे, पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.